राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे-भाजपा सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे समर्थक नेते आणि आमदार सहभागी झाल्याने सत्तेतील समिकरणं बदलली आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला काही मंत्रिपदांवर पाणी सोडावं लागले आहे. तर आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्य़े मिळणाऱ्या जागांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक आणि महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. २०२४ च्या निवडणुकीत एकाही आपल्यासोबत आलेल्या ५० आमदारांपैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, विधानसभेच्या निव़डणुका आपण महायुती म्हणून लढवणार आहोत. मी पहिल्या भाषणात सांगितलं होतं की, हे ५० आमदार आणि २०० आमदारांचा टप्पा आपण पार करणार आहोत. मी पहिल्या भाषणात सांगितलं होतं की, सोबत आलेल्या एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही. तेच मी पुन्हा एकदा सांगतो की, एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही.
दरम्यान, राजकारणात काही बेरजेची गणिते असतात. त्याकरिता काही नवे मित्र सरकारमध्ये सामील करून घ्यावे लागतात. मात्र, त्यामुळे चिंता करायचे कारण नाही. हा एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री असून, त्याच्यामागे २०० पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील मेळाव्यात आपल्या समर्थक आमदार व शिवसैनिकांना आश्वस्त केले. तसेच मी बोललो तर पळता भुई थोडी होईल, असा इशाराही त्यांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी दिला.