लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज, गुरुवारी दुपारी छत्रपती संभाजीराजे मुंबईला गेले होते. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले असता त्यांना दीड ते दोन तास ताटकळत रहावे लागले. शिंदे यांनी भेट न दिल्याने छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेल्याचा प्रकार घडला आहे.
संभाजीराजेंनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा आढावा घेतला. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी संभाजीराजेंसोबतमराठा समाजाचे समन्वयक व समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास माजी खासदार संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले. संभाजीराजेंनी त्यांना वारंवार निरोप देऊनही शिंदेंनी भेट दिली नाही. या प्रकारानंतर संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले. या प्रकाराबद्धल त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत..यापूर्वीही मराठा आरक्षण प्रश्नी झालेल्या बैठकीत त्यांना बसण्यास सन्मानाची जागा न दिल्याने वाद झाला होता.