शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 07:47 AM2024-10-24T07:47:16+5:302024-10-24T07:47:49+5:30
एका निरोपाच्या गोंधळामुळे शिंदे दिल्लीत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे बैठक होऊ शकली नाही.
यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याचे ठरविले, त्यानुसार भाजप, अजित पवार गटाचे नेते दिल्लीत रात्री पोहोचलेदेखील; पण मध्येच लक्षात आले की बैठकीचा स्पष्ट निरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेलाच नाही. परिणामत: शिंदे दिल्लीत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे बैठक होऊ शकली नाही.
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरू शकलेला नाही. अमित शाह यांनी राज्यातील नेत्यांना आधीच सांगून ठेवलेले होते की, ज्या जागांवर तुमच्यामध्ये एकमत होणार नाही, त्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत या, आपण निर्णय घेऊन टाकू. जवळपास ३० जागा अशा आहेत की ज्यावर तिन्ही पक्षांचे एकमत होऊ शकलेले नाही. काही जागांवर तिघांचा तर काहींवर दोन पक्षांचा दावा असल्याने अंतिम जागावाटप अडले आहे. संमती झालेल्या जागांवर उमेदवार तिन्ही पक्षांनी जाहीर केले आहेत. अडकलेल्या जागा सोडविण्यासाठी बुधवारी दिल्लीत जाण्याचे ठरले.
त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खा. प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे हे रात्री एकाच विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले. सगळे विमानात बसले आणि मग असे लक्षात आले की शिंदे यांनी बुधवारी रात्रीच दिल्लीत पोहोचायचे आहे असा स्पष्ट निरोप त्यांना दिला गेलेला नाही.
शिंदे आज सकाळी जाणार
- शिंदेंना निरोप गेला नसल्याने मग धावपळ, फोनाफोनी सुरू झाली. तोवर असे कळले की शिंदे हे विमानाने गुवाहाटीवरून गोव्याला जायला निघाले आहेत. त्यामुळे त्यांना निरोप देता येणे शक्य नव्हते.
- ते गोव्याला उतरून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळला निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशासाठी जाणार होते. राणे यांनी मोठी तयारी केली होती आणि तो कार्यक्रम रद्द करणे शक्य नव्हते आणि दुसरे म्हणजे तेवढ्या वेळात परत दिल्लीला जाणेही शक्य नव्हते. त्यामुळे शिंदे हे कुडाळच्या कार्यक्रमाला गेले आणि मग चार्टर्ड फ्लाइटने मुंबईला रात्री उशिरा परतले.
- ते दिल्लीला जाऊ शकले नाहीत, त्यामुळे अमित शाह यांच्याबरोबरची तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊ शकली नाही. फडणवीस, अजित पवार, पटेल, तटकरे आणि नागपूरहून पोहोचलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यामुळे दिल्लीतच मुक्काम करावा लागला. आता शाह यांच्यासोबत आज, गुरुवारी सकाळी बैठक होणार आहे.