संदीप प्रधान / ठाणेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती प्रचारानंतर आणि शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ होऊनही बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता स्थापन होण्याबाबत संभ्रम असला, तरी ठाणे महापालिकेचा गड सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ राखलाच नाही, तर शिवसेनेला संपूर्ण बहुमत प्राप्त करून देत, नवा इतिहास रचल्याने आता त्यांची ओळख ‘बाहुबली’ अशी झाली आहे. शिंदे यांच्याकरिता ही आनंदाची व तेवढीच चिंतेची बाब आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.मुंबई महापालिकेत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने उद्धव यांनी आपले सर्व लक्ष तिकडे केंद्रित केले होते. ठाण्यात मराठी माणसाचे प्रमाण ४२ टक्क्यांच्या आसपास असल्याने काहीशी निर्धास्त असलेली सेना शिंदेंच्या हाती ठाकरे यांनी सोपवली होती. या विश्वासाला सार्थ ठरवत शिवसेनेने ६७ जागांवर मुसंडी मारली असून, ही संख्या बहुमताच्या ६६ या जादुई आकड्यापेक्षा एका जागेने जास्त आहे. ठाण्याच्या आखाड्यात नोकरशाहीच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर बार ओढणारा भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर दंगल खेळतानाच, चारीमुंड्या चीत होऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. येथे राष्ट्रवादीला ३४, तर भाजपाला केवळ २३ जागा मिळाल्या. २०१२ च्या तुलनेत भाजपाच्या जागा १५ ने वाढल्या आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशस्वितेशी तुलना करता तुटपुंजे आहे. खुद्द भाजपाचे नेते गेले काही दिवस ३२ ते ३५ जागांचा दावा करीत होते.शिवसेनेचे नेते शिंदे यांनी भाजपाचे आव्हान उभे राहिल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत पक्षाची पडझड होऊ दिली नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन केली. विधान परिषदेच्या निवडणुकीत रवींद्र फाटक यांना निवडून आणले. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाची धूळधाण उडवली. आता ठाण्यात बाजी मारताना कधीही शिवसेनेला प्राप्त न झालेले बहुमत स्वबळावर खेचून आणले. त्यामुळे शिंदे यांचे शिवसेनेतील सध्याचे स्थान हे एके काळी नारायण राणे यांचे सिंधुदुर्गात आणि गणेश नाईक यांचे नवी मुंबईत जे स्थान होते, तसे प्रबळ झाले आहे. शिंदे यांच्या याच कर्तृत्वामुळे त्यांना शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपद दिले होते. मात्र, शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यावर जनाधार गमावलेल्या सुभाष देसाई यांना ज्येष्ठतेच्या निकषावर गटनेतेपद बहाल करून शिंदे यांच्या डोक्यावर बसवण्यात आले. ही बाब शिंदे यांना खुपली आहे. त्याच देसाई यांच्या गोरेगावात शिवसेनेने गुरुवारी सपाटून मार खाल्ला आणि भाजपाने बाजी मारली. छगन भुजबळ, गणेश नाईक, आनंद दिघे व नारायण राणे हे नेते जेव्हा शिवसेनेत अत्यंत प्रभावशाली झाले, तेव्हा नेतृत्वाच्या मनातील असुरक्षिततेमुळे त्यांच्या नशिबी शिवसेनेत वनवास आला. आताही शिवसेनेला राज्याच्या सत्तेतून बाहेर पडायचे असेल, तर शिंदे यांच्यासारख्या जनाधार असलेल्या नेत्यांचा कल पाहून निर्णय घ्यावा लागेल, अशी कुजबुज आहे. एमआयएमचा मुंब्रा येथे उदयमुंब्रा येथे एमआयएमला दोन जागांवर विजय प्राप्त झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपले दुसऱ्या क्रमांकाचे स्थान राखल्याबद्दल ते समाधानी असतानाच एमआयएमचा उदयही विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांच्याकरिता डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
ठाण्यात एकनाथ शिंदेच ठरले बाहुबली
By admin | Published: February 24, 2017 5:56 AM