लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बरे झाले देशद्रोह्यांसोबत चहापान टळले’, असे विधान केले होते. संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाबाबत सत्ताधारी आक्रमक झाल्याने आता या विधानाचा आधार घेत विरोधकांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही सूचना दाखल झाल्याने गुरुवारी पुन्हा परिषदेत यावरून घमासान होणार आहे.
राज्याचा प्रमुखपदी असलेल्या एका लोकप्रतिनिधीने असे विधान केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून माझा आणि सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग आणि अवमान झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव देत आहे, असे पत्र अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांना दिले आहे.
विरोधी पक्षातील आमदार शशिकांत शिंदे, अभिजीत वंजारी, सचिन अहिर, सुनील शिंदे, राजेश राठोड, वजाहत मिर्झा, सतेज पाटील आदींनी या हक्कभंग सूचनेसंदर्भात उपसभापतींची भेट घेतली.