मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 07:43 AM2024-11-30T07:43:45+5:302024-11-30T07:46:42+5:30
अजित पवारांसोबत उपमुख्यमंत्रिपदावर काम करायचं की नाही यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले नाही. शिंदे फडणवीस सरकारचा भाग होतील अशी आशा भाजपाला आहे.
मुंबई - २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात महायुती पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट झाले. मात्र नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप स्पष्ट नाही. दिल्लीतील अमित शाहांसोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असतील असं ठरवण्यात आल्याचं कळतं, परंतु अद्याप याची कुठलीही घोषणा नाही. त्यातच एकनाथ शिंदे शुक्रवारी अचानक महायुतीच्या बैठका सोडून त्यांच्या साताऱ्यातील मूळगावी गेले आहेत. त्यामुळे सरकार स्थापना आणि शपथविधी सोहळा लांबणीवर पडल्याची चिन्हे आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. ५ डिसेंबरपर्यंत शपथविधी सोहळा पार पडेल अशी सूत्रांकडून माहिती मिळते.
सोमवारी २ डिसेंबरला शपथविधी सोहळा होईल अशी अपेक्षा होती मात्र शिंदेंच्या गैरहजेरीमुळे महायुतीच्या बैठका रद्द झाल्या. मोदी-शाह यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आता ५ डिसेंबर तारीख समोर आली आहे. गुरुवारी रात्री दिल्लीतील अमित शाहांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्यात सर्वाधिक जागा जिंकल्याने भाजपाचा मुख्यमंत्री होईल हे जवळपास निश्चित झाले. अजित पवारांसोबत उपमुख्यमंत्रिपदावर काम करायचं की नाही यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले नाही. शिंदे फडणवीस सरकारचा भाग होतील अशी आशा भाजपाला आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात एकनाथ शिंदेंकडून महत्त्वाची खाती मागितली आहे. त्यात विधान परिषदेच्या सभापतीपदाचीही मागणी आहे. हे पद शिंदेसेनेला द्यायला भाजपाचा विरोध नाही. मात्र गृह खात्याचा आग्रह भाजपा मान्य करत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते आणि अजित पवारांकडे अर्थ खाते जाईल असं बोललं जाते. केवळ संख्येच्या आधारे सत्तावाटप केले जाऊ नये असा युक्तिवाद शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे कारण भाजपा बहुमताच्या १४५ आकड्यापासून काही पाऊले दूर आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद, मंत्रिपदाचे वाटप यावरील चर्चा अद्याप सुरू आहे.
त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी गेलेत. त्यामुळे महायुतीची बैठक झाली नाही. शिंदेंची तब्येत अस्वस्थ असल्याने ते गावी गेल्याचं उदय सामंत यांनी सांगितले. शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का असा प्रश्न पत्रकारांनी सामंत यांना केला असता शिंदेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात राहावे आणि त्यांनी सरकारमध्ये असावे ही आमची इच्छा आहे असं म्हटलं. शनिवारी अमावस्या असल्याने सत्तास्थापनेबाबत काही हालचाल होण्याची शक्यता नाही अशीही माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, भाजपाने त्यांच्या निवडून आलेल्या आमदारांना अद्याप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी मुंबईत बोलावले नाही. भाजपा आमदारांची बैठक सोमवारी होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतरच मु्ख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे वाटप यावर तिन्ही पक्षातील विधिमंडळ प्रमुख बैठक घेतील. जर मुख्यमंत्रिपदी राहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद स्वीकारू शकतात तर शिंदेंनीही हे पद स्वीकारावे असं भाजपा नेत्यांना वाटते.