राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यांचे राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासोबत वाद होते. या पार्श्वभूमीवर ए. वाय. पाटील थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंचावर दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही वेळापूर्वीच सिद्धगिरी मठातील कार्यक्रमात मुख्यमंत्री दाखल झाले आहेत. या मंचावर ए. वाय. पाटीलही आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ए. वाय. पाटील यांच्यावर जबाबदारी टाकल्यानंतर त्यांनी झोकून देऊन काम केले. मात्र पक्षाने सातत्याने अन्याय केल्याची भावना त्यांची आहे. पक्षनेतृत्वाने अनेक वेळा आश्वासने देऊनही शब्द पाळला नाही. गेली अनेक वर्षे पक्षासोबत प्रामाणिकपणे काम करुनही योग्य तो सन्मान दिला नाही, याची खंत त्यांच्या मनात आहे. हसन मुश्रीफांनी पाटलांचे वादळ शमल्याचे म्हटले होते.
राष्ट्रवादीला हादरा बसणारए. वाय. पाटील यांनी बंड करुन राष्ट्रवादीशी फारकत घेतली तर राष्ट्रवादीला हादरा बसू शकतो. आगामी बाजार समिती, जिल्हा परिषद, बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा त्रास होऊ शकतो.