एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला अजित पवार जबाबदार?; काँग्रेसचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 05:52 PM2022-06-23T17:52:21+5:302022-06-23T17:52:52+5:30
काँग्रेसचे ४४ आमदार एकत्र आहेत. विधान परिषदेत आपसात लढाई होती. त्यामुळे व्होट क्रॉसिंग झाली असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
मुंबई - राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे समर्थक ४० हून अधिक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे मी मुख्यमंत्री नको असेन तर मला येऊन सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे. त्यातच आता शिंदे यांच्या बंडखोरीवरून काँग्रेसनं अजित पवारांना जबाबदार धरलंय का असा प्रश्न निर्माण होतो.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिवसेना-भाजपात लढाई झाली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमातून पुढे आले. सरकार जनतेसाठी काम करेल हा विचार होता. अर्थ खाते राष्ट्रवादीकडे होते. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचं समोर येत होते. शिवसेनेच्या आमदारांना अजित पवार त्रास द्यायचे या तक्रारी येत होत्या. काँग्रेस आमदारांनाही असाच त्रास होत होता. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला निधी मिळत नव्हता. हे सरकार जनतेसाठी होते एका पक्षासाठी नव्हतं. त्याचा विरोध आम्ही करायचो आणि हा विरोध स्वाभाविक होता असं त्यांनी सांगितले.
तसेच काँग्रेसचे ४४ आमदार एकत्र आहेत. विधान परिषदेत आपसात लढाई होती. त्यामुळे व्होट क्रॉसिंग झाली. आम्हाला सत्तेची लालसा नाही. काँग्रेसला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला होता. आजही आमची विरोधात बसण्याची तयारी आहे. हिंदुत्व नाही ईडीचा विषय आहे. सगळ्यांना हे माहिती आहे. जनतेला सगळं ठाऊक आहे. ईडीच्या माध्यमातून भाजपा हा खेळ खेळत आहेत. सरकार ५ वर्ष चालेल. सत्तेसाठी भाजपा कुठल्या थराला जाऊ शकते हे दिसून येत असल्याचं सांगत नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतु या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील घडामोडींवर भाजपाचं लक्ष
"महाराष्ट्रातील घडामोडींवर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील नेत्यांचे बारीक लक्ष आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे महत्त्वाचे नेतेमंडळी देखील या घडामोडींवर नजर ठेवून आहेत. मी याबद्दल आतातरी काही बोलणार नाही. या साऱ्या घटना पाहता महाराष्ट्राच्या हिताचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे जे निर्णय असतील ते निर्णय घेण्यास ते समर्थ आहेत", असं विधान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.