जालना - आज मी केंद्रात मंत्री आहे, टोपे राज्यात मंत्री आहेत. मला अडीच वर्ष झाले तर टोपे यांना १४ वर्ष झाली. तुमच्या कारकिर्दीत आणखी काही कामे करायची असतील तर लवकर करून घ्या, वेळ निघून चालली आहे. आम्ही २-३ दिवस विरोधी पक्षात आहोत असं सूचक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथील कार्यक्रमात बोलताना केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपा पुन्हा सत्तेत येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
दानवे आणि टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाच भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी दानवे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना एकत्र सामोरे गेले. जनतेने युतीला बहुमत दिले. प्रचारात मोदी-शाह व्यासपीठावर बोलले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील. तेव्हा शिवसेना आणि शिवसैनिक काहीही बोलले नाही. परंतु जेव्हा निकालानंतर आमच्याशिवाय सरकार बनत नाही असं लक्षात आल्यानंतर असंगाशी संगत केली. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यासोबत सरकार बनवले. सरकार बनवल्यानंतरही चांगले चालवायला पाहिजे होते असं त्यांनी सांगितले.
परंतु मुख्यमंत्री असताना २ वर्ष मंत्रालयात गेले नाहीत. आमदारांना भेटत नव्हते. निधी राष्ट्रवादीला मिळत होता, काँग्रेसला मिळत होता पण शिवसेनेच्या आमदारांना मिळत नव्हता ही त्यांची तक्रार आहे. राज्याच्या प्रश्नाकडे तिन्ही पक्षाच्या लोकांनी दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम शिवसेनेत असंतोष वाढला. आज शिवसेनेचे ४० आमदारांनी बंड केले. सरकार आम्ही पाडणार नाही असं आम्ही नेहमीच सांगितले. भाजपाचा याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत असंही रावसाहेब दानवे म्हणाले.
शिंदे-फडणवीस यांची भेट नाही एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांची भेट झाली नाही. आमच्या बैठका सुरूच असतात. आम्ही बैठका घेतो, राज्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नाराज गटाने आमच्याकडे प्रस्ताव दिला नाही. प्रस्ताव आल्यास पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही असं सांगत रावसाहेब दानवेंनी अधिक भाष्य करणं टाळलं.