गुवाहाटी - विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला हादरा बसला आहे. शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ४१ आमदार थेट सूरतमार्गे आसामच्या गुवाहाटीला पोहचले आहेत. अपक्ष आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्याकडे ४७ हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
त्यातच आता शिंदे गटाच्या एका आमदाराची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला आहे. या संवादात गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या आमदारक्या खातंय असं म्हटलं आहे. शहाजी पाटील म्हणतात की, ही लढाई शंभर टक्के जिंकणार आहे. कसाय हे घडतं कशासाठी उद्धव साहेबांना कोणाचाच विरोध नाही. त्यांना प्रत्येक आमदार हा आतासुद्धा देवमाणूस मानतोय. माझ्यासहीत सगळ्यांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल एवढा आदर हाय. अडीच वर्षांत आमच्या आमदारक्या राष्ट्रवादी कॉंग्रेस खातंय, उद्या भांडण झालं तर राष्ट्रवादी आमचे मतदारसंघ हाणतंय. आम्ही मोकळ राहतोय हीच भावना प्रत्येकाचीय अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
त्याचसोबत शिवसेनेचे जवळ जवळ ४१ झालेत, अजू्न दोघे तिघे वाटेवर आहेत ४५ होतील. अपक्ष एक ७ ते ८ होतील. अडीच वर्षे तुम्हाला सांगतो तुमची जबाबदारी काय तालुक्याचा विकास होईल फक्त बघत राहावा. ऐतिहासिक विकास आपल्या तालुक्याचा होणार आहे. इतिहासाला याची नोंद घ्यावी लागणार. अडीच वर्षे झाली. याला काय पैसे हाय का फंड हाय काय ओ, नुसतं सांगोला उपसा सिंचन योजना याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन हे नाव द्या, तेरा - चौदा पत्रं मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली. जयंत पाटील साहेबांच्या कार्यालयाला पाठवले. कोणी त्याचा विचार करेना अशी खंत शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली.
पुढे काय करणार?आता साहेब निर्णय घेणार, साहेबांच्या मनावर हाय. एक सांगतो सरकार १०० टक्के झालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, चांगली संख्या मंत्रिपदाची एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला मिळणार. आपल्याला दिलं दिलं,नाय नाय, फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री म्हणजे आपणच उपमुख्यमंत्री हो, फडणवीस अन् आपलं नातं भावा-भावासारखं आहे. एकनाथ शिंदे मला मुलासारखं बघतंय, लयच प्रेमळ नजर हाय त्या माणसाची माझ्यावर हाय असंही शहाजी पाटील यांनी कार्यकर्त्याला सांगितले.