Eknath Shinde Revolt Shivsena: शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले. शिवसेना आणि ला शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सुरतच्या ला मेरेडियन हॉटेलमध्ये होते. त्यानंतर बुधवारी या सर्वांना विशेष विमानाने आसाममधील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये हलवण्यात आले. शिंदे यांच्या समर्थनार्थ जवळपास ४० आमदार आहेत आणि आणखी १० आमदार येणार असल्याचे स्वत: एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धोका निर्माण झाला असल्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत भाजपाकडूनउद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली.
सुमारे २५ वर्षे असलेली शिवसेना-भाजपा युती २०१४ मध्ये तुटली. पण सत्तेत दोन्ही पक्ष एकत्र होते. त्यानंतर २०१९ मध्ये सेना भाजपा एकत्र लढले. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा या एका मुद्द्यावर शिवसेना भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीत सामील झाली. गेल्या अडीच वर्षांत आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा होती. आमदारांची कामे होत नसल्याचीही चर्चा रंगली होती. त्या चर्चांना दुजोरा देणारा प्रकार सोमवारी रात्रीपासून घडला. एकनाथ शिंदे आणि बरेचसे आमदार बंडखोरी करून नॉट रिचेबल झाले. यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
"उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळले, एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी महविकास आघाडी गुंडाळली...एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले आमदार माध्यमांसमोर एकच तक्रार करतायत आमची काम होत नव्हती...कारण स्पष्ट आहे, गेली अडीच वर्षे फक्त वसूली सुरू होती", अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला टोला लगावला.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे सध्या जवळपास ४० आमदारांच्या पाठिंबा असल्याचे सांगत आहेत. तसेच आणखी १० आमदारही त्यांच्यासोबत येणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत शिंदे गट भाजपाच्या साथीने सत्तास्थापनेचा दावा करू शकतो. मात्र यात एक ट्विस्ट असा की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रूग्णालयात आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच कसा सोडवला जाईल, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.