मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. शिंदे यांच्या गटात जवळपास ३७ हून अधिक शिवसेनेचे आमदार सहभागी झाले आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे १८ आमदार असल्याचं चित्र आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका शिंदे समर्थक आमदारांनी घेतली आहे. त्याच काही आमदारांना दमदाटी करून अपहरण करून आणल्याचा आरोप खासदार संजय राऊतांकडून केला जात होता.
आज वर्षा येथे शिवसेना आमदारांची बैठक होती. या बैठकीत शिवसेनेचे १८ आमदार उपस्थित होते. त्यात शिंदे गटातून निसटलेले कैलास पाटील, नितीन देशमुख यांनी कशाप्रकारे सूरतला नेले असा गंभीर आरोप केला आहे. तेव्हा नितीन देशमुख यांनी हे सगळं भाजपानं रचलेला डाव आहे. मी सूरतला गेल्यानंतर त्याठिकाणी ३००-३५० पोलिसांनी मला पकडून जबरदस्तीने नेले. एका हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितले.
नितीन देशमुख म्हणाले की, सुरुवातीला मला काहीतरी कट शिजतोय असा अंदाज आला. मी सूरतमधून निसटण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्यावर दबाव टाकून मला तिथे अडकवलं. त्यानंतर मी शिवाजी महाराजांप्रमाणे शक्ती नव्हे युक्ती लढवत गनिमी कावा केला. गुवाहाटीहून मी कसाबसा निसटलो आणि महाराष्ट्रात पोहचलो. जेव्हा मी महाराष्ट्रात पोहचलो तेव्हा मला विजयी झाल्याचा आनंद झाला असं त्यांनी सांगितले.
परंतु नितीन देशमुख यांच्या खळबळजनक आरोपानंतर शिंदे गटाकडून देशमुखांच्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून फोटो शेअर करण्यात आले आहे. गुवाहाटीवरून नितीन देशमुख यांना स्पेशल चार्टर्ड प्लेनने मुंबईत सोडण्यात आल्याचं दिसून येत आहे. स्वइच्छेने नितीन देशमुख सूरतला गेले होते आणि स्वइच्छेने परत आले असं शिंदे गटाकडून करण्यात आला. विमानाने त्यांना मुंबईत सुखरूप सोडण्यात आले. याचे फोटो आता समोर आले आहेत. त्यामुळे पळून आले असा दावा करणाऱ्या नितीन देशमुखांच्या आरोपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संजय राऊतांचा आव्हान शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतु या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.