मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत शिवसेनेचे तब्बल ३८ आमदार वेगळे झाले आहेत. या आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत थेट गुवाहाटी गाठलं आहे. त्यात आता राज्यातील सरकारवर अस्थिरतेचे सावट आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
एकीकडे राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी निर्माण झालेली असताना देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. फडणवीस दिल्लीत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मैदानात उतरलेले शरद पवारही आज दिल्लीला गेल्याची माहिती आहे. दिल्ली येथे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. त्यासाठी पवार दिल्लीला गेल्याची माहिती आहे.
विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेत राजकीय भूकंप झाला. शिंदेपाठोपाठ शिवसेनेचे १-१ करत तब्बल ३८ आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला पोहचले. या नाराज आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले. आम्ही शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत असं सांगत आमदारांनी आम्हीच शिवसेना ही भूमिका घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
त्यांचे बाप अनेक, आमचा बाप एकच बाळासाहेब - राऊतशिवसेनेच्या नावाचा वापर करुन बंडखोरांनी मतं मागू नयेत. त्यांनी त्यांच्या बापाचं नाव लावावं, ते स्वत: बाळासाहेबांचे भक्त म्हणतात, पण बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं नाव देण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण, तुम्ही तुमच्या बापाचं नाव द्या, तुमच्या बापाच्या नावानं पक्ष बनवा आणि बापाच्या नावानं मतं मागा. आमच्या पक्षाचा जो बाप आहे, त्याच्या नावाने का मते मागता. तुम्हाला तर १०० बाप आहेत तिकडं, कोणी दिल्लीत आहे, कोणी नागपुरात आहे, कोणी मुंबईत आहे, असे म्हणत राऊत यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टिका केली.
शिवसेनेच्या नावावरच निवडून येतो असं नाही - केसरकर'आम्ही कोणाच्याच नावाने मते मागितलेली नाही. आम्ही अन्य पक्षातूनही निवडून आलो आहोत. फक्त शिवसेनेच्या नावावर निवडून येत असते तर सगळे निवडून आले असते. उमेदवाराचंही गुडविलं असतं आणि पक्षाचंही ठराविक मतदान असतं. आजच्या विधान सभेतील किमान ७० ते ८० किंवा १०० उमेदवार कुठल्याही चिन्हावर निवडून येऊ शकतात. आमदारांचं मतदारसंघात आणि जिल्ह्यात काम असतं,' असे म्हणत शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना उत्तर दिलं.