बीड - राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण पेटलं आहे. एकीकडे शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३८ आमदार फुटले आहेत. तर बंडखोर आमदारांविरुद्ध शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. शनिवारी शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचं पुण्यातील कार्यालयावर तोडफोड केली. त्यानंतर तानाजी सावंत यांनी चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा केली.
त्यानंतर आता बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते पुढे आले आहेत. पुण्यात ज्याठिकाणी सावंत यांच्या कार्यालयात तोडफोड केली. आज त्याठिकाणी काही कार्यकर्त्यांनी फुले वाहण्यात आली. तर दुसरीकडे बीड येथे तानाजी सावंत समर्थनार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एका शिवसैनिकाची गाडी फोडली. त्यामुळे आता दोन्ही बाजूने आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे.
बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवणार राज्यात शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाले असताना आता केंद्र सरकारने यात दखल घेतली आहे. केंद्राचे सीआरपीएफ जवान बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणार आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या आणि कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची असताना संरक्षण हटवण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी केला. त्यामुळे केंद्राने कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी बंडखोर आमदारांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
तानाजी सावंत यांनी दिला होता इशाराबंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला होता. "एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल" असं म्हणत इशारा दिला. सावंत यांनी "आमचे गटनेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं" अशी फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे आता शिंदे गटही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.