Eknath Shinde Shivsena Ajit Pawar | महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, शिवसेनेत नाराजी नाट्य पण अजित पवार कुठे आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:28 PM2022-06-21T14:28:40+5:302022-06-21T14:44:41+5:30
एकनाथ शिंदेंप्रमाणे २०१९ मध्ये अजित पवारांनी पुकारलं होतं बंड
Eknath Shinde Shivsena Ajit Pawar: राज्यसभा निवडणुकी पाठापोठ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाजपाने पराभव केला. भाजपाचे पाच पैकी पाचही उमेदवार विधान परिषदेवर निवडून आले. त्यानंतर आज महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता दिसत आहे. महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे अचानक गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमधील सुरतच्या हॉटेलात शिवसेनेचे सुमारे २८-३० आमदार आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे. असाच प्रकार २०१९मध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याबाबत घडला होता. त्यामुळे सध्याचा राजकीय गोंधळात अजित पवार नक्की कुठे आहेत, अशी चर्चा आहे.
२०१९ साली महाविकास आघाडी स्थापन होत असल्याच्या प्रक्रिये दरम्यान राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह अजित पवार बंडखोरी करून भाजपासोबत गेले होते. भाजपाने अजित पवार गटासोबत शपथग्रहण करून सत्तास्थापना केली होती. पण दीड दिवसांत ते सरकार पडले होते. आता एकनाथ शिंदे यांनी काहीशा तशाच पद्धतीचे बंड केले आहे. या साऱ्या गोंधळात, उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे आहेत, असा सवाल विचारला जात आहे. परंतु, राजकीय गोंधळात अजित पवार मात्र आपलं राज्याप्रति असलेले कर्तव्य पार पाडताना दिसत आहे. अजित पवार मंत्रालयातील कार्यालयात विविध बैठका घेण्याचे कार्यक्रम पार पाडत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंट वरून देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात नियमित कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली, असे लिहून त्या बैठकीचे फोटोही ट्वीट करण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात नियमित कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली. pic.twitter.com/lRk0f6AZun
— NCP (@NCPspeaks) June 21, 2022
--
उप मुख्यमंत्री मा.@AjitPawarSpeaks दादा यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील भाजपचे नेते तथा माजी जि.प. अर्थ व बांधकाम सभापती श्री.कैलासराव वाघचौरे, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री.वसंतराव मानकर, नगर तालुक्यातील माजी जि.प. सदस्य श्री. बाळासाहेब हराळ यांनी @NCPspeaks पक्षात प्रवेश केला. pic.twitter.com/b5wUrEz4en
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) June 21, 2022
ऑपरेशन लोटस सुरू झालंय का?
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत विजयी होणारे भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. त्यावेळी, 'ही ऑपरेशन लोटसची महाराष्ट्रातील सुरूवात आहे का?', असा सवाल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "शिवसेनेमध्ये नक्की काय सुरू आहे ते आम्हाला माहिती नाही. आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत. पुढे काय होतंय पाहूया. आम्हालाही न्यूज आणि मीडियामधूनच या गोष्टी समजत आहोत. आम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहोत. खरं पाहता शिवसेना अजूनही दावा करते की त्यांची ३ मते फुटली आणि पराभव अपक्षांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. खरं तर शिवसेनेची १२ मते फुटली आहेत. कोण-कोण फुटले अशी नावं सांगू शकत नाही, पण हा शिवसेनेला मोठा धक्का आहे."