आलिबाग:शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेकडून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसैनिकाचे मेळावे घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आलिबागमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला, यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला.
'त्यांचा हिंदूत्वाशी संबंध नाही'
''एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी 22 आमदार दुसऱ्या पक्षातून आले आहेत, त्यांचा हिंदूत्वाशी काहीही संबंध नाही. त्यातले बरेच लोक राष्ट्रवादीतून आलेले आहेत. आता का तुम्ही राष्ट्रवादी आणि शरद पवारांना शिव्या घालत आहात? कालपर्यंत तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होता. राज्यात शिवसेनेची सत्ता येईल, या अपेक्षेने तुम्ही शिवसेनेत आलात आणि आता ढुंगणाला पाय लावून पळून गेला. महाराष्ट्रात ज्यांनी बाळासाहेबांच्या पाठींत खंजीर खुपसला, त्याचं वाटोळं झालं आहे, असं इतिहास सांगतो. इथे निष्ठेला किंमत आहे, श्रद्धेला किंमत आहे," अशी टीका राऊत यांनी केली.
संबंधित बातमी- 'ठिकंय, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू पण...' संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान
'संपत्ती जमवताना त्यांची आठवण आली नाही'
ते पुढे म्हणाले, "आज आनंद दिघेंना जाऊन 22 वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षात तुम्हाला ते आठवले नाही, पण आता त्यांच्या नावाने राजकारण करत आहात. ते जिवंत असताना मी त्यांची मुलाखत घेतली होती, आम्हाला आनंद दिघे कोण आहेत, माहिती आहे. तुमच्यापैकी अनेकांना त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. आज तुम्ही त्यांचे नाव घेऊन राजकारण करत आहात, पण प्रचंड माया जमवताना, संपत्ती जमवताना त्यांची आठवण आली नाही. आता तुम्हाला मंत्रीपद हवंय, मुख्य म्हणजे, तुम्हाला ईडीपासून सुटका करुन घ्यायची आहे,'' असंही राऊत म्हणाले.