Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. अनेक आमदारांना घेऊन शिंदे सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. पण, याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांच्या पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टमधून याबाबत दावा करण्यात येत आहे.
विधान परिषदेच्या निकालादिवशी सरकार आणि गुप्तचर यंत्रणेच्या हातावर तुरी देत एकनाथ शिंदे अनेक आमदारांना घेऊन आधी सूरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर एकएक करत इतर काही आमदारही त्यांच्या गटात सामील झाले. याची माहिती गृहविभाग किंवा पोलीस विभागाला कळू शकली नाही. त्यामुळे आता या सर्व आमदारांच्यासोबत असलेल्या पीएसओ, कमांडे आणि कॉन्स्टेबलवर कारवाई होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याबाबत गृहविभागावर नाराजी व्यक्त केली होती.
संबंधित बातमी- "...तर मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा", बीडच्या शेतकरी पुत्राचे थेट राज्यपालांना पत्र
ही बंडखोरी अचानक झाली नसून, गेल्या काही महिन्यांपासून याची योजना आखण्यात येत होती, अशीही माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांच्या गुप्त बैठका व्हायच्या, पण त्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना त्या-त्या जिल्ह्यातील आमदारांच्या सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.