Maharashtra Political Crisis: विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघाले आहे. यामुळे शिवसेनेतील नाराजीही आता उघड झाली आहे. यातच, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
'स्वाभिमान जागृत झाला म्हणून बंड पुकारले' कालही नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेतून या प्रकरणावर भाष्य केले होते. "अपमानित करणे, तुला मुख्यमंत्री बनवतो, असे दहा वेळा सांगून त्यांना निवडणुकीत, तसेच काही इतर घटनांमध्ये खर्च करायला सांगायचे आणि नंतर आपणच मुख्यमंत्री व्हायचे, फसवणूक करायची, असे अनेक वेळा एकनाथ शिंदेंबद्दल घडले आहे. यातून शेवटी त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि म्हणून त्यांनी हे बंड पुकारले असेल", असे नारायण राणे यांनी म्हटले होते.