मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेचे जवळपास ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा सल्ला दिल्याचं पुढे आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होत आहे. या भेटीआधी दोन्ही नेत्यांचे फोनवरून संवाद साधला. या संवादात सरकार वाचवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला आहे. सरकार अल्पमतात असल्याने पवारांनी हा सल्ला दिला आहे. शिंदे गटाचा पाठिंबा घेऊन भाजपा पडद्यामागून सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे फेसबुक लाईव्हमधून उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केले. जर माझे मुख्यमंत्रिपद नको असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंद आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागेल.
'त्या' बैठकीत काय घडलं?सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी बैठकीनंतर मला बोलावलं. तेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. कारण दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते होते. मग जिद्दीने अनुभव नसताना मी जबाबदारी स्वीकारली. राजकारणात वळणं असतात. आजपर्यंत मला प्रशासनाने खूप सहकार्य केले. होय, मला धक्का बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगितले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर समजू शकतो. दोघांची विचारसरणी वेगळी आहे. मात्र त्या दोघांनी माझ्यावर भरवसा ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नको असतील तर राजीनामा देण्यास तयार आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
शिवसैनिकांना आवाहनज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.