मुंबई: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. सध्या सेनेत उद्धव ठाकरेची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना, असे चित्र पाहायला मिळत आहे. या बंडामुळे मनसेकडून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहेत. दरम्यान, मुंबईत शिवसेनेची खिल्ली उडविणारे बॅनरही मनसेकडून लावणण्यात येत आहेत.
मनसेचे चांदीवलीमधील पदाधिकारी महेंद्र भानुशाली यांनी शिवसेनेला बॅनर्सच्या माध्यमातून डिवचल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 2017 साली मनसेचे सात नगरसेवक होते. त्यातील सहा नगरसेवकांचा गट शिवसेनेने फोडला होता. त्याची आठवण या बॅनर्सच्या माध्यमातून भानुशाली यांनी करुन दिली आहे. या बॅनरवर "त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय?" असा खोचक प्रश्न विचारला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना भानुशाली म्हणाले की, "मी राज ठाकरेंचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी त्यांचा भक्तच आहे. त्यावेळी जे आम्हाला सातत्याने सांगत होते की, सहा नगरसेवक गेलेत तर मनसे संपली. आता एकनाथ शिंदे तुमचे 36 आमदार घेऊन गेले. म्हणजे सहा गुणीले सहा. याचा अर्थ सहा पट देवाची लाठी तुम्हाला लागलेली आहे. काही दिवसांपूर्वी एकच बातमी चालायची की आमचे खरे हिंदूत्व आणि त्यांचे खोटे हिंदूत्व. संपूर्ण भारताने राज ठाकरेंच्या रुपात कट्टर हिंदूत्ववादी नेता पाहिला. आज यांची अशी परिस्थिती झालीय की, तुमचेच आमदार तुम्ही हिंदूत्व सोडल्याचे सांगत आहेत," असं भानुशाली म्हणाले.