गुवाहाटी - विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र दिसून येत आहे. शिंदे याच्यासोबत शिवसेनेचे ३९ आमदारांसह १२ अपक्ष आमदार आहेत. या आमदारांविरोधात सातत्याने शिवसेनेचे नेते संजय राऊत जहरी टीका करताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांचे अनेक बाप आहेत, आमचा बाप एकच आहे असं राऊतांनी म्हटलं होतं.
संजय राऊतांच्या विधानावर बंडखोर आमदार संतप्त झाले आहेत. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बंडखोर आमदारांच्या भावना माध्यमांसमोर मांडल्या. केसरकर यांनी सांगितले की, संजय राऊत यांच्यावर बंडखोर आमदार संतप्त आहे. या लोकांची मते घेऊन राज्यसभेत गेला. थोडीशी शिल्लक असेल तर राजीनामा द्या, तुमचे राष्ट्रवादीत हितचिंतक आहेत त्यांची मते घेऊन राज्यसभेत जा. संजय राऊतांना मतदान करून आम्ही चुकलो, आमच्या चुकीबद्दल ईश्वराची माफी मागतो. आमच्याकडून मते मिळाली त्यांनी राजीनामा द्यावा. राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार व्हावं. ते अर्धावेळ राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून काम करतात. आमच्याबद्दल बोलू नये. असा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला देऊ नये अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
तसेच संजय राऊतांनी गुवाहाटीला येऊच नये ही कळकळीची विनंती. मी संयमाने बोलतोय. बाळासाहेब ठाकरे असते तर हाकलून लावलं असतं. बाळासाहेब असते बंडखोरी झालीच नसती. त्यांनी मायेने पाठिवर थाप फिरवून म्हणणं ऐकून घेतलं असते. संजय राऊतांचे ईडीचे प्रकरण जुनेच आहे. राऊतांचे टायमिंगही चुकीचं असते. कालपर्यंत आम्हाला मृत झालेले आहेत बोलतात. संजय राऊतांचे टायमिंग चुकतं. सकाळी ९ पत्रकार परिषद करून ईडीच्या प्रश्नांना सौम्य भाषेत उत्तर द्यावीत असा टोला दीपक केसरकर यांनी राऊतांना लगावला.
विजय सत्याचा होईल - केसरकरएकनाथ शिंदे हेच आमचे नेते असून आम्हीच शिवसेना आहोत. अजय चौधरी यांची नेमणूक अवैध आहेत. विधानसभा उपाध्यक्षांनी जी नोटीस दिली आहे ती बेकायदेशीर आहे. १४-१५ जणांना घेऊन नवी निवड केली ती बेकायदेशीर आहे. जोपर्यंत आम्हाला ही मान्यता मिळत नाही तोवर पक्षाविरोधात काही कृती केली असं करणार नाही. अंतिम विजय सत्याचा होईल असंही केसरकर यांनी म्हटलं.