मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाच्या ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला विरोध केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारवर संकट उभं राहिले आहे. यातच आता शिंदे गटाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मविआ सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
शिंदे गट राज्यपालांना पत्र पाठवून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढणार असल्याचं कळवणार आहे. आम्ही सरकारचा पाठिंबा काढल्याचं शिंदे गटाने याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. शिंदे गटाच्या ३९ शिवसेना आमदार आणि इतर १२ अपक्षांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या दाव्याचा विचार केला तर महाविकास आघाडीकडे आता फक्त ११५ आमदारांचं बहुमत उरलेलं आहे आणि त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे असे समजण्यास काही हरकत नाही असं याचिकेत म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दोनदा फोनशिवसेनेचे ८ मंत्री शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र या सर्व राजकीय घडामोडीत एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन केल्याची बातमी समोर आली आहे. शिंदे यांनी आतापर्यंत दोनदा राज ठाकरेंना फोन केला आहे. यावेळी राज यांच्या प्रकृतीसोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यामुळे सत्तानाट्यात मनसेची एन्ट्री झाली आहे. शिंदे गटाला विलीनीकरण करायचं असल्यास त्यांच्यासमोर भाजपा, प्रहार यांचा पर्याय होता. परंतु त्यात मनसे हादेखील चांगला पर्याय शिंदे गटाला ठरू शकतो याबाबत चाचपणी केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.
शिंदे गट अन् भाजपाची आतापर्यंत तीन फेऱ्यांची चर्चाराज्यात भाजप-एकनाथ शिंदे गट असे सरकार स्थापन झाल्यास महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या मंत्री असलेल्या व शिंदे गटात सामील झालेल्या सगळ्यांना मंत्रिपदे दिली जाणार आहेत. हा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील. या शिवाय शिंदे गटातील गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत हे पुन्हा कॅबिनेट मंत्री होतील, असं सांगण्यात येत आहे.