ठाणे:
मुंबई, ठाणे, सुरत ते गुहाटी असा प्रवास शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा सुरु आहे. परंतु या प्रवासात या आमदारांच्या देखरेखीसाठी ठाण्यातील सात माजी नगरसेवकांची फौज सध्या महत्वाची भुमिका बजावत असल्याची माहिती पुढे आली आहे. पहिल्या दिवसापासून ही फौज त्याठिकाणी असून त्यांच्या खांद्यावर या आमदारांची जबाबदारी टाकण्यात आल्याची माहिती शिंदे समर्थक सुत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता त्यांच्या फळीत जमा होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यातही ठाण्यात आता शिंदे यांना मानणारा मोठा गट असल्याचेही दिसून आले आहे. त्यानुसार आता त्यांच्याकडून महत्वाच्या खेळी खेळल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे शिंदे यांच्या टिम आता कामाला लागल्या आहेत. शिंदे यांना माननारे अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी, जेष्ठ पदाधिकारी हे आजही त्यांच्या सोबत असल्याचेच दिसत आहे. त्यानुसार आता एक टीम शिंदे यांच्या सोबत असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये त्यांच्या जवळचे जुने खंदे समर्थक माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, संजय मोरे, कणसे आदींसह सात माजी नगरसेवक सध्या महत्वाची जबाबदारी पार पाडत असल्याची माहिती शिंदे यांच्या सुत्रंनी दिली. या सात मावळ्यांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांना शिंदे यांच्या सोबत असलेल्या इतर आमदारांची खातरजमा करायची आहे. याशिवाय त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी देखील सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे ते डोळ्यात तेल घालून आपल्या नेत्याने टाकलेल्या जबाबदारीवर खरे उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. सुरवातीला मुंबईहून निघालेल्या या आमदारांसाठी ठाण्यातील उपवन येथील महापौर निवास याठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकाणी महत्वाची चर्चा झाल्यानंतर हे सर्व आमदार पुढे सुरतच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती देखील आता पुढे आली आहे. दरम्यान यापूर्वी देखील महापालिकेत सत्तेची समीकरणो जुळविण्यासाठी यातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर शिंदे यांनी विश्वास टाकला होता. त्यानुसार आता देखील हा विश्वास सार्थकी ठरविण्यासाठी हे मावळे दिवस रात्र एक करुन या आमदारांवर लक्ष ठेवून आहेत. त्यांना काय हवे काय नको, हे देखील त्यांच्याकडून बघितले जात आहे. एकूणच पुढील काही दिवस या सात मावळ्यांवर महत्वाची जबाबदारी असणार असून ते यात कितपत यशस्वी होणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.