Eknath Shinde Devendra Fadnavis: "मैं खामोश हूँ क्यों की...."; CM शिंदे यांची शायरी अन् फडणवीसांच्या चेहऱ्यावरही आलं हसू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 07:23 PM2022-12-30T19:23:12+5:302022-12-30T19:23:50+5:30
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंची तुफान बॅटिंग
Eknath Shinde Devendra Fadnavis, Winter Session 2022: भ्रष्टाचारबद्दल माझ्यावर आणि इतर मंत्र्यांवर विरोधक वेगवेगळे आरोप करताना दिसत होते. पण त्यातून त्यांच्याहाती काहीच लागलं नाही. हे सगळं कोणी केलं, बैठका कुठे झाल्या, हे सगळं मला महिती आहे. मी प्रत्येकाचा आदर करतो, मला कोणावरही टीका करायची नाही, पण आमच्याबाबत जे शब्द वापरले जातात ते योग्य आहेत का याचा तुम्हीच विचार करा. मी गप्प आहे कारण मला सगळं माहिती आहे. 'मै खामोश हूँ क्यों की मै सब जानता हूं, बात निकलेगी तो बहोत दूर तक जायेगी', अशा शायराना अंदाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या या भाषणाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या शेजारीच बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरही मिस्किल हसू दिसून आले.
"बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलं की एकदा शब्द दिला की ती बंदुकीची गोळी असते, सुटली म्हणजे सुटली. विरोधक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की अण्णा हजारे यांनी मागणी केलेले लोकायुक्त बिल आम्ही पास करण्याचे धाडस दाखवले. तुम्ही सत्तेत असताना हा पारदर्शक कारभार का केला नाही. आम्ही आमचे मंत्री आणि मंत्रिमंडळ लोकायुक्ताच्या कक्षेत आणण्याचे धाडस दाखवले. त्यामुळे माझ्यावरही किंवा माझ्या सरकारवर कोणीही बिनबुडाचे आरोप करू नका. माझा स्वभाव टीका करण्याचा नाही, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी हतबल आहे. मै खामोश हूँ क्यों की मै सब जानता हूं, बात निकलेगी तो बहोत दूर तक जायेगी. म्हणून मी जास्त काही बोलत नाही," अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
धरणातील पाण्याच्या वादग्रस्त विधानावरूनही अजितदादांना टोला
"अजितदादा, तुम्ही काल बोललाच की मी आता चुकत नाही. मी आता काळजी घेतो. पण जेव्हा शेतकऱ्यांनी पाणी मागितलं होतं तेव्हा तुमच्या तोंडून काहीतरी निघून गेलं. तेव्हा मग तुम्हाला आत्मक्लेश करायला जावं लागलं," असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. त्यावर अजित पवार बाकावर बसूनच म्हणाले- "मी आत्मक्लेश केला होता. तुम्ही १८५७ चा विषय पुन्हा काढू नका." यावर पुन्हा शिंदे म्हणाले, “मी चुकीचं सांगत नाही. तुम्ही आत्मक्लेश केलात. मी १८५७ चा विषय काढत नाहीये. पण तुम्ही ५० वर्षांपूर्वीचे काढायला लागले आहात. आम्ही ते काढत नाही. मी कधीही तुम्हाला वाईट बोलणार नाही. आत्मक्लेश करणं याचा अर्थ वाईट नाही. माणूस जेव्हा चुकतो, तेव्हा जो चूक सुधारतो. तो त्या माणसाच्या मनाचा मोठेपणा असतो. पण एक माणूस चुकतो. दोन-पाच माणसं चुकू शकतात. पण ५० माणसं चुकीचे आणि मी एकटा बरोबर असं कसं होऊ शकतं?", असा कोंडीत पकडणारा सवाल त्यांनी अजित पवार यांनाच केला. "मी फक्त तुमच्याबद्दल बोलत नाही. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही आता बोलताना काळजी घेता ही चांगलीच बाब आहे, पण इतरांनीही ते समजून घ्यायला हवं", असे एकनाथ शिंदे म्हणाले आणि अनेकांना टोला लगावला.