मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट प़डली आहे. तसेच गेल्या आठ दिवसांतील घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील ही लढाई कोर्टात पोहोचली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीतून शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. कोर्टाने या प्रकरणातील पुढील सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलतानाच तोपर्यंत या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असे आदेश दिले आहेत. तसेच अविश्वास प्रस्तावाबाबतही कोर्टाने कुठले स्पष्ट आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
सुप्रिम कोर्टातून मोठा दिलासा मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा आत्मविश्वास उंचावला आहे. या बंडखोर आमदारांनी आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना अजून मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. आता शिंदे गट आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्याची शक्यता आहे. तसेच त्याला मान्यता मिळाल्यास आपल्यासोबत नसलेल्या इतर सेना आमदारांना अपात्र ठरवण्याच्या दिशेने पावले उचलणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुप्रिम कोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर आता शिंदे गट महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याची तयारी करण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून पाठिंबा काढण्याबाबतचे पत्र राज्यपालांना दिले जाणार असून, त्यानंतर राज्यपाल उद्धव ठाककरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश कधीही देऊ शकतात.