लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याच्या बातम्या गेले काही दिवस माध्यमांमधून (लोकमत नव्हे) रंगल्या असताना आज या बातम्या तथ्यहीन असल्याचे शिवसेनेने अधिकृतरीत्या स्पष्ट केले. शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी या बातम्या खोट्या ठरल्या तर माध्यमे माफी मागतील का, असा उलट सवाल केला. ते म्हणाले की, या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. ज्यांनी या बातम्या दिल्या त्या पत्रकारांना आमचे जाहीर आव्हान आहे की, जर या बातम्या चुकीच्या ठरल्या तर तुम्ही त्या मंत्र्यांची माफी मागणार का? शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार चांगले काम करते आहे, हे काम असेच करत राहू.
अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे या मंत्र्यांना हटवा असे आदेश भाजपश्रेष्ठींनी शिंदेंना दिल्याचा दावा या बातम्यांमध्ये (लोकमत नव्हे) करण्यात आला होता.
विस्तार नेमका कधी?
मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवेसेनेचे आमदार, खासदार यांची मुंबईत बैठक घेतली. सगळेच मंत्री चांगले काम करत आहेत. सहकारी मंत्र्यांचे कौतुक करून शिंदे यांनी कोणालाही वगळले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच तर तो जुलैतील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होऊ शकतो. हे अधिवेशन १७ जुलैपासून मुंबईत सुरू होत आहे.