मुंबई - राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या निवडणुकीत संख्याबळ नसताना भाजपाने पाचवा उमेदवार उभा करून जिंकून आणला. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसची मते फुटली. निकालानंतर भाजपाचा जल्लोष सुरू होता. सर्वकाही ठीक असताना अचानक मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याचं समोर आले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही संपर्कात नाही. त्यानंतर हे सर्व गुजरातच्या सुरत येथे असल्याचं समोर आले.
मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला जबर धक्का बसला. वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली. या बैठकीला केवळ १८ आमदारांनी उपस्थिती लावली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे यांच्याजागी अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सध्या सुरत येथे भाजपा नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा सुरू आहे. काही वेळाने याठिकाणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसही पोहचणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे. त्यात वर्षावर गेलेल्या आमदारांपैकी तिघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण आहे, भाजपासोबत चला, असं त्यांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टपणे सांगितलं आहे. दादा भुसे, संजय राठोड आणि संतोष बांगर यांनी भाजपासोबत चला, नाहीतर वेगळा निर्णय घ्यावा लागेल असं सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यास नकारआता राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण आहे. आमच्या मतदारसंघांमध्ये गळचेपी होत आहे. त्यांच्याबरोबर निवडणुका लढणं अशक्य आहे. राष्ट्रवादी आम्हाला खाऊन टाकेल. त्यामुळे नेते, पदाधिकारी, आमदार, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या. अडीच वर्षं सत्तेचा वापर राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीबद्दल शिवसेनेत प्रचंड आक्रोश आहे. पुढेही त्यांच्यासोबत राहिलो, तर फक्त खच्चीकरणाचा प्रयत्न आहे अशी नाराजी आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर बोलून दाखवली.
बैठकीत काय घडलं? या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या सरकारला काहीही धोका नाही. जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही आणि आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, भगव्याचे रक्षक आहोत. आपल्याला एकत्र राहायचं आहे असा विश्वास त्यांनी आमदारांना दिला. मुंबईत सेंट रेजीस हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले आहे. त्या आमदारांसोबत शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि गटप्रमुख ही साखळी ठेवण्यात आली आहे. तुर्तास या आमदारांमध्ये कुठली फोडाफोड होऊ नये यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.