अर्ज भरण्याचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले आहेत, तस तसे एकनाथ शिंदे अडलेल्या जागांवर उमेदवार जाहीर करू लागले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकीकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली असताना आता कुठे शिंदेंनी आपला उमेदवार जाहीर केला आहे.
ठाण्यामध्ये विचारेंविरोधात शिंदेंनी माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी प्रताप सरनाईकांचे नाव चर्चेत आघाडीवर होते. परंतु शिंदेंनी आपल्या शिलेदाराला उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वी श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर केले होते. परंतु, विरोधकांनी फडणवीसांच्या तोंडून नाव जाहीर करावे लागते, अशी टीका केली होती. यावर श्रीकांत शिंदे यांनी आम्ही वेगळे नाव जाहीर करणार असे म्हटले होते. भाजपाचा विरोध असल्याने शिंदे यांना उमेदवारी उशिराने जाहीर करण्यात आली आहे.
दोन जागांवर उमेदवार दिले असले तरी आणखी एक तिढा असलेली जागा नाशिक, तिथे शिंदे गटाने उमेदवार जाहीर केलेला नाही. या ठिकाणी छगन भुजबळही इच्छुक होते. तर दोन दिवसांपूर्वीच शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. शांतीगिरी यांना शिंदेंनी एबी फॉर्म दिलेला नाही. यामुळे या जागेवर अद्याप गुंतागुंत वाढलेलीच आहे.
माजी महापौरांचा लोकसभेच्या तिकीटापर्यंतचा प्रवास...
दोन वेळा स्विकृत सदस्य म्हणून ते पालिकेत दाखल. त्यानंतर 2012 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना मिळाले. परंतु 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. अखेर पक्षाला त्यांची दखल घ्यावीच लागली. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि सर्व पक्षीयांशी असलेल्या सखोलाच्या नात्यामुळेच अखेर पक्षाला त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली आणि भाजपाला दिलेले कमिटमेंट मोडत त्यांना स्थायी समितीचे सभापतीपदही बहाल करावे लागले होते. त्यानंतर आता 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत सभागृह नेते पद त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी महापौर पदाची धुराही ही सांभाळली. शिंदे यांचे विश्वासु समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद ही आहे.