- हेमंत बावकर
लोकसभेसाठी इच्छूक असलेले, शिंदे गटातील मंत्री उदय सामंता यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत तर राजापूर मतदारसंघातून किरण सामंत यांना शिवसेनेच्या पहिल्याच यादीत स्थान मिळाले आहे. यामुळे कोकणात महायुतीतच मोठे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
उदय सामंत यांनी आपल्या उमेदवारीसाठी ताकद लावली नाही यामुळे नाराज झालेले किरण सामंत यांनी एन लोकसभेच्या प्रचारावेळीच बंड केले होते. किरण सामंत यांनी उदय सामंत यांचे फोटो, बॅनर हटविले होते. भाजपाचे नेते, माजी मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारालाही ते गेले नव्हते. यामुळे नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी याचा बदला विधानसभेला घेणार अशी घोषणा केली होती.
निलेश राणे आज कुडाळ-मालवण मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. तर नितेश राणे, नारायण राणे हे भाजपातच राहणार आहेत. नितेश राणे यांना कणकवलीतून भाजपाचे तिकीट देण्यात आले आहे. यामुळे सलगच्या चार मतदारसंघांमध्ये दोन-दोन सख्खे भाऊ असे समीकरण तयार झाले आहे. निलेश राणे हे आक्रमक स्वभावाचे असल्याने आता खुद्द किरण सामंतच निवडणुकीला उभे ठाकल्याने काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभेवेळी किरण सामंत यांना विधेनसभेला राजापूरमधून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा होती. ती खरी ठरली आहे. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार राजन साळवी उभे राहणार आहेत. ठाकरे शिवसेना वि. शिंदे शिवसेना अशी लढत होणार असली तरी राणे फॅक्टर बराच काही परिणाम घडवू शकणारा असा हा मतदारसंघ आहे. आता शिंदे शिवसेनेत दाखल होत असलेले निलेश राणे नमती भुमिका घेतात की किरण सामंत यांना सहकार्य न करण्याची भुमिका घेतात यावर साळवींचा जय-पराजय अवलंबून असणार आहे.