नाशिक - विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघासाठी छगन भुजबळांनीसमीर भुजबळांचे नाव पुढे घेताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आक्रमक झाले आहेत. ५ वर्ष ते दिसले नाहीत, मात्र ८ दिवसांपासून विविध कार्यक्रम घेतायेत. पंकजभाऊंची इच्छा पूर्ण झाली आता समीरभाऊंचीही इच्छा पूर्ण करायची आहे. जर जमलं तर छगन भुजबळही आले तरी मी स्वागत करेन. भुजबळांनी स्वत: उभं राहावे, मी आपल्यासमोर लढायला तयार आहे. जर मला पक्षाने आदेश दिला तर मी येवल्यातूनही उभं राहायला तयार आहे असं आव्हान आमदार सुहास कांदे यांनी दिले.
आमदार सुहास कांदे म्हणाले की, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाला बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहे. शिवसेना पूर्वीपासून आदेशावर चालत आला. एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो मला मान्य राहील. माझ्या शिवसैनिकांना तो आदेश मान्य राहील. नांदगाव आणि येवला मतदारसंघ जवळच आहे. छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढायला मी कधीही, केव्हाही आणि कुठेही तयार आहे. मी भुजबळांना पाडेन असं मला वाटतं. ५ वर्षातून एकदा यायचं, कार्यक्रम घ्यायचे. गेली १० वर्ष तुम्हाला जनतेने डोक्यावर घेतले पण तुम्ही लोकांचा विकास केला नाही असा आरोप त्यांनी भुजबळांवर लावला.
तसेच पंकज भुजबळ, समीर भुजबळांना आव्हान आहे, तुमचा १० वर्षाचा विकास आणि माझा अडीच वर्षाचा विकास, कारण आधीचे अडीच वर्ष कोरोनात गेले, हा जनतेसमोर येऊ द्या. समोरासमोर चर्चा करू. पंकज भुजबळ, समीर भुजबळ हे राजकीयदृष्ट्या छोटे आहेत माझे थेट मोठ्या भुजबळांना चॅलेंज आहे, आपण नांदगावात काय केले, समोर बसा, तुमच्यापेक्षा कमीत कमी ५०० कामे जास्त नसतील तर मी राजीनामा देईन असंही आमदार सुहास कांदे यांनी म्हटलं.
दरम्यान, जनता हुशार आहे. ज्याचा त्याचा इतिहास आहे. इतिहासानुसारच प्रत्येकजण वागतं. बाळासाहेबांसोबत काय झाले, शरद पवारांसोबत काय झाले, आता या पक्षासोबत काय झाले हे जनतेला माहिती आहे. भुजबळांचा इतिहासच प्रत्येकासोबत राजकीय हेतूने काय केले हे माहिती आहे. महायुतीसोबत छगन भुजबळ असं करत असतील तर ते नवीन नाही. त्यांचा इतिहासच आहे. कधीकधी माझ्यावर राजकीय प्रेम जास्त असेल म्हणून भुजबळ मतदारसंघात कार्यरत असतील असा टोला आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळांना लगावला.