शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 08:04 AM2024-12-12T08:04:59+5:302024-12-12T08:06:02+5:30
हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे
मुंबई - बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. शिवसेना-राष्ट्रवादी यांना देण्यात येणाऱ्या खात्यांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. फडणवीस आणि अजितदादा सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. येत्या १४ डिसेंबरला कॅबिनेटचा विस्तार केला जाऊ शकतो. यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहखाते आणि महसूल खाते देण्यास भाजपा तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
सूत्रांनुसार, १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात शिवसेनेला पुन्हा एकदा नगरविकास मंत्रालय मिळू शकते. महसूल आणि गृह खाते मिळण्याची शक्यता नाही. भाजपाला मुख्यमंत्रिपदासह २१ किंवा २२ मंत्रिपदे स्वत:कडे ठेवू शकते. त्यात ४-५ मंत्रिपदे रिक्त ठेवली जाऊ शकतात. मंत्रिमंडळ खातेवाटपावरून चर्चेला उशीर होत आहे कारण त्यात महायुतीचे तिन्ही प्रमुख घटक पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये कमाल ४३ मंत्री होऊ शकतात असं PTI नं वृत्त दिलं आहे.
STORY | Maharashtra cabinet expansion likely by Dec 14; Fadnavis to meet PM in Delhi
— Press Trust of India (@PTI_News) December 11, 2024
Read: https://t.co/5GJdLkLEehpic.twitter.com/LBMEPzECoy
तर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. १६ डिसेंबरपासून नागपूर इथं अधिवेशन होणार आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्याठिकाणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ते राज्यात परतणार आहे. त्यानंतर याठिकाणी महायुतीच्या नेत्यांची बैठक होऊन मंत्रिपदे आणि खातेवाटपाबाबत चर्चा होणार आहे अशी माहिती शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० हून अधिक जागा मिळवून मजबूत बहुमतासह सरकार स्थापन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्व इच्छुकांचे डोळे लागले आहेत. मंत्रिमंडळात भाजपा २०-२१, शिवसेना ११-१२ आणि राष्ट्रवादीला ९-१० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात मागील सरकारमधील काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.