Eknath Shinde Devendra Fadnavis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडण्याची वेळ आली. माझे शिवसैनिक मला भेटून माझ्यासमोर सांगत असतील की मी मुख्यमंत्री म्हणून नालायक आहे तर मी मुख्यमंत्रीपदही सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटाला घातली. या प्रकारानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत, शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. या साऱ्या घडामोडींनंतर संजय राऊत यांनी एक घोषणा केली. बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन चर्चा केल्यास शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करेल असे ते म्हणाले. या साऱ्या गोंधळात भाजपाचे महत्त्वाचे नेते कुठे आहेत अशी चर्चा रंगली आहे. याच दरम्यान, भाजपाचे नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठं विधान केले.
"महाराष्ट्रातील घडामोडींवर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील नेत्यांचे बारीक लक्ष आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे महत्त्वाचे नेतेमंडळी देखील या घडामोडींवर नजर ठेवून आहेत. मी याबद्दल आतातरी काही बोलणार नाही. या साऱ्या घटना पाहता महाराष्ट्राच्या हिताचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे जे निर्णय असतील ते निर्णय घेण्यास ते समर्थ आहेत", असे प्रमोद सामंत म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे. परंतु आमदारांनी २४ तासांत मुंबईत परत यावे, तिथे बसून पत्रे पाठवत बसू नये, असे संजय राऊत म्हणाले. मी अधिकृतपणे ही भूमिका मांडतोय, असे संजय राऊत म्हणाले.