राज्यातील एकंदरित राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मुळ आधार असलेला मतदार दुरसीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्यबाणाकडे वळला. बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेकडे आला, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एवढेच नाही, तर मूळ शिवसैनिक मतदारांपैकी किती टक्के मतदार आपल्याकडे वळला आणि किती टक्के दुसऱ्या बाजूला गेला याची आकडेवारीही शिंदे यांनी यावेळी मांडली. ते बुधवारी मुंबईमध्ये पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत हेते. यासंदर्भात त्यांनी केलेला दावा भविष्यात उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो, असे बोलले जात आहे.
शिंदे म्हणाले, "या संपूर्ण वावटळीमध्ये (लोकसभा निवडणूक) , या एकंदरित राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा जो मुळ आधार आहे, जो मतदार आहे, तो शिफ्ट झाला नाही. तो दुरसीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्यबाणाकडे वळला. याचे उदाहरण म्हणजे, शिवसेनेचे १९ टक्के मतदार होते. बंधू आणि भगिनींनो, शिवसेनेच्या या १९ टक्के मुळ मतदारांपैकी १४.५ टक्के मतदार या आपल्या बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेकडे आले आणि ४.५ टक्के मत तिकडे राहिली. हे या निवडणुकीत (लोकसभा निवडणूक) त्यांनाही कळलंय. मग इतर मते कशी आली? कुठून आली? उमेदवार कसे जिंकले? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणून, मी एवढंच सांगतो की, ही तात्पुरती आलेली सूज आहे, ती काही दिवसांनी उतरतेही."
"हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढेही जिंकत राहील" -"एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार, असे काही लोक बरळत होते. मात्र, या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात घशात घातले. हा शिंदे संपला नाही, हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने. माझ्या या व्यासपीठावरील सहकाऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढेही जिंकत राहील, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी विरोधकांना दिला."
"...ते धाडस एकनाथ शिंदेने करून दाखवलंय" -शिंदे म्हणाले, "अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. तुमचं आणि या महाराष्ट्रातील जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. आणि हे प्रेम जोवर माझ्यासोबत आहे. तोवर हा एकनाथ शिंदे कधीही घाबरणार नाही. कधी घाबरला नाही. ज्या प्रकारचं धाडस या देशात कुणी केलं नाही, ते धाडस एकनाथ शिंदेने करून दाखवलंय. यामुळे भीती माझ्या रक्तात नाही. माझ्या शब्दकोशात नाही."
"खरी शिवसेना कोणाची आहे? याचा निकाल जिनतेनेच दिला आहे," -शिंदे म्हणाले, "कोकणात उबाठा साफ, ठाणे, कल्याण, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही उबाठा साफ. मुंबईत चार जागा कशामुळे गेल्या हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. आपण १३ जागा समोरासमोर लढलो. त्यातील 7 जागा आपण जिंकल्या. यात उबाठाचा स्ट्राईक रेट आहे ४२ टक्के, तर आपला ४७ टक्के आहे. त्यांना १३ जागांवर ६० लाख मते मिळाली, तर आपल्याला ६२ लाख मते मिळाली. आपल्या १५ उमेदवारांना ७४ लाख मते मिळाली. अर्थात सरासरी ४ लाख ९३ हजार मते मिळाली. त्यांच्या २१ उमेदवारांना किती मते मिळाली? तर ४ लाख ५० हजार. म्हणजेच आपण सगळीकडे उबाठापेक्षा सरस आहे. खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना आणि तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली. खरी शिवसेना कोणाची आहे? याचा निकाल जिनतेनेच दिला आहे," असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.