शिवसेना आणि त्याचा धनुष्यबाण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा झाला आहे. यामुळे आता शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांना लागू होणार की नाही यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकंदरीतच ठाकरे आणि शिंदे प्रकरणाने सर्वांनाच कोड्यात टाकले आहे. कायद्यांच्या पळवाटा शोधून शोधून त्याचा कस लावला जात आहे. असे असताना शिंदे गटाने शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांना व्हिप जारी करण्याची तयारी सुरु केली आहे.
शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावे असे वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. प्रतोद भरत गोगावले त्याबाबतचा व्हिप जारी करणार आहेत. जे उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या या ५६ आमदारांमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांचाही समावेश आहे. दुसरीकडे संजय राऊतांवरही अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. याबाबत संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. यासाठी आज बैठक घेण्यात आली होती.
शिंदे गटाला ठाकरे गटातील आमदारांसाठी व्हिप वापरता येणार नाही, असे कायदेतज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी म्हटले आहे. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी देखील असेच वक्तव्य केले आहे. शिवसेना शिंदे गटाची किंवा शिवसेना ठाकरे गटाची गोष्टी आहेत. हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, असे निवडणूक आयोगाने स्वत:च म्हटलेले आहे. यामुळे मुख्य पक्ष जरी शिंदेंचा असला तरी शिवसेना हा सत्ताधारी नाही. यामुळे भाजपा जसा इतर पक्षांवर व्हिप लावू शकत नाही तसेच इथेही आहे. यामुळे शिंदे गट व्हिप जारी करू शकत नाही, असे अणे यांनी म्हटले आहे.