Eknath Shinde vs NCP: "आम्ही आता सत्तेत आहोत. पुढची अडीच वर्षे आम्ही खूप चांगले काम करू. आमचे काम इतके चांगले होईल की त्यानंतरची पुढची पाच वर्षेही आम्ही या बाजूला (सत्ताधारी) राहू. कारण आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही. कोण कधी कुठे असतो, कोण बाहेर असतो, कोण आत असतो... हे काहीच कळत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की 'मी पुन्हा येईन', त्यानुसार, ते आले आणि आम्हालाही सोबत आणले. आता आम्ही दोघे एकत्र आहोत. फडणवीस मुख्यमंत्री असताना ते एकटे विरोधी पक्षाला पुरून उरायचे. आता आम्ही दोघे आहोत, म्हणजेच एक से भले दो", अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर चक्क राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी अक्षरश: हात जोडले. त्यामुळे वातावरण अतिशय हलकेफुलके झाल्याचे दिसले.
"जयंत पाटील यांनी कालच्या भाषणात माझ्यावर टीका केली होती. निती आयोगाच्या बैठकीच्या वेळी मी मुख्यमंत्र्यांच्या रांगेत सर्वात मागे उभा असल्याचे तुम्ही सांगितले. पण तुम्हाला माहिती आहे की तेथील बैठक खूप महत्त्वाची असते. अशा वेळी मी काय काम केले, कोणते मुद्दे मांडले, महाराष्ट्रासाठी काय काय मागणी केली.. हे तुम्ही सांगायला हवे होते पण तसे न करता तुम्ही रांगेचा मुद्दा धरून बसलात. पण लक्षात ठेवा की येथे रांग महत्त्वाची नसते तर काम महत्त्वाचे असते. आणि जयंत पाटील ज्या प्रकारे बोलत होते, त्यावरून मला असं वाटलं की ते राष्ट्रीय प्रवक्त्यांची जागा घेतात की काय", असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.
"जयंत पाटील मला म्हणत होते की तुम्ही आमच्या बाजूला या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. पण तुम्ही मला ही ऑफर देण्याआधी अजितदादांना विचारलं आहेत का... कारण तुम्हाला त्यांना विचारणे गरजेचे आहे. तुम्हाला तर विरोधी पक्षनेता पण व्हायचं होते, पण तुम्हाला ते होता आलं का? कालच्या भाषणावरून ते दिसत होतं आणि चेहऱ्यावरूनही दिसत आहे", अशा शब्दांत शिंदे यांनी त्यांची खिल्ली उडवली.
"काँग्रेसबद्दल तर दया येते. काँग्रेसला महाविकास आघाडीमध्येही थोडं कमी महत्त्वाचं स्थान मिळालं. आताही विधान सभा आणि विधान परिषदेत विरोधी नेतेपक्ष पदी अजितदादा आणि अंबादास दानवे बसले. आताही काँग्रेसला काही मिळालं नाही. आता त्यांनी कुठे जायचे... बाळासाहेब थोरात अनेकदा माझ्याशी बोलले आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यथा मला माहिती आहेत. पण आता त्यांना पण आमच्या बाजूला घ्यायचे का?", अशी मिस्कील टिपण्णी त्यांनी केली.
माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला. होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, कारण महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट मी घेतले आहे. राज्य अधिक समृद्ध करण्याचे कंत्राट मी घेतलं आहे. गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे आणि त्यांचे अश्रू पुसण्याचे कंत्राट मी घेतले आहे. जनसामान्यांमध्ये मिसळून त्यांचे दु:ख दूर करण्याचे कंत्राट मी घेतले आहे.