खेड: काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि दोन गट तयार झाले. एकीकडे उद्धव ठाकरे गट तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेतली. यावेळी त्यांनी आपली गोळीबारवरुन तुफान फायरिंग केली.
यावेळी बोलताना एकनाध शिंदे म्हणाले की, ते लोक आज आपली सभा पाहत असतील. पूर्वी झालेल्या सभेची गर्दी आणि आजच्या सभेची गर्दी दिसत आहे. याच मैदानात बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती. काही दिवसांपूर्वीच याच गोळीबार मैदानात फुसका बार येऊन गेला. मी त्यांना उत्तर द्यायला आलो नाही. उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचे असते. परंतू, तोच-तोच थयथयाट...तिच तिच आदळ आपट, याला काय उत्तर देणार.
मी राज्यभर फिरणारा मुख्यमंत्रीमला वर्षावर राज्यातील सोन्यासारखी माणसं भेटतात, त्यांना एक कप चहा पाजू शकत नाही का? त्याचाही तुम्ही हिशोब काढता. कोरोना काळात वर्षा बंद होता.आज वर्षा सर्वांसाठी खुला आहे. मी मुख्यमंत्री होईल, हे मला वाटलं नव्हतं. पण, माझ्या पाठिशी सगळे आले, म्हणूनच नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी मला मुख्यमंत्री केलं. देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केलं. मी फिरणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसणारा नाही. मी लोकांमध्ये जातो, मला त्यांना भेटायला आवडते.
...म्हणून दिल्लीवारी करतोते पुढे म्हणाले, मी वारंवार दिल्लीला जातो, म्हणून माझ्यावर टीका करतात. माझ्या दिल्लीला जाणाचे कारण म्हणजे, मी तिकडून मोठ-मोठे प्रकल्प आणतो. मी दिल्लीवरुन राज्यासाठी पैसा आणतो. मी दिल्लीला जातो आणि राज्यातील तरुणांसाठी रोजगार आणतो. मागे डावोसला गेलो आणि तिकडून मोठे प्रकल्प आणले. राज्यासाठी केंद्रातून हजारो-लाखो रुपयांचे प्रकल्प आमच्या सरकारने आणले. त्यासाठी मी वारंवार दिल्लीला जातो आणि यापुढेही जात राहीन. माझ्यात अहंकार नाही, मी राज्यातील लोकांसाठी मी दिल्लीला जाणार. राज्यातील सरकार आता सायलेंट मोडवर नाही, अलर्ट मोडवर आहे.
तुम्ही फक्त गाजरं दाखवत बसलात...आमच्या सरकारमध्ये एवढे निर्णय घेतले की, वाचायला एक तास लागेल. पेट्रोल-डिझेल, शेतकऱ्यांसाठीचे निर्णय, महिलांसाठी अर्धे तिकीट यांसह अनेक निर्णय घेतले. हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. आम्ही जो अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये सगळ्या लोकांना घेतलंय. त्यांनी आम्हाला गाजराचा हलवा म्हटले, आम्ही गाजराचा हलवा तरी दिला. तुम्ही फक्त गाजरं दाखवत बसलात. आमचा पर्सनल अजेंडा नाही, सर्वसामान्य लोकांचे आयुष्य बदलले पाहिजे, हाच आमचा अजेंडा आहे, असेही शिंदे म्हणाले.