एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेकडूनही एक खेळी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार किंवा तो गट पक्षादेशाचं उल्लंघन करत असून त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली होती. त्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली. शिवसेनेनं १२ आमदारांच्या निलंबनातची मागणी केली होती. दरम्यान, यानंतर एकनाथ शिंदे यांनी यावर जोरदार प्रत्युत्तर देत अशा धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचं म्हटलं.“कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला आहे. १२ आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत, असंही ते म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला.
धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना; एकनाथ शिंदेंनी दाखवला कायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 10:41 PM