मुंबई - शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, परंतू ठाण्यातील त्यांचे खास पदाधिकारीदेखील सुरतला गेले आहेत. याच दरम्यान आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही" असं म्हणत शिंदेंनी सूचक ट्विट केलं आहे.
"आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही" असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुढील २२ आमदारांसह सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे.
सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरेऔरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाटकन्नडचे आमदार उदयसिंग राजपूतवैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारेअलिबागचे आमदार महेंद्र दळवीकर्जतचे आमदार महेंद्र थोरवेमहाडचे आमदार भरतशेठ गोगावलेआटपाडीचे आमदार अनिल बाबरभुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकरपाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईसांगोल्याचे आमदार शहाजी पाटीलसाताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदेपाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटीलमेहकरचे आमदार संजय रायमुलकरबुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडअंबरनाथचे आमदार बालाजी किणीकरपालघरचे आमदार श्रीनिवास वनगाभिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरेकल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर
दरम्यान, शिवसेनेचे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे. या आमदारांनी शिवसेना भाजपासोबत गेल्यास आम्ही तुमच्यासोबत राहू असेही म्हटल्याचे समोर येत आहे. शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी मिळत नाही, मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कामांना हा निधी दिला जातो. यावेळी आमदारांना विश्वासातही घेतले जात नाही. याच्या तक्रारी उद्धव ठाकरेंकडे केल्यावर त्याची दखलही घेतली जात नाही, अशा तक्रारी शिवसेना आमदारांच्या होत्या. या साऱ्या वातावरणातच राज्यसभेला शिवसेनाचा उमेदवार पडला, याची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.