Eknath Shinde vs Sanjay Raut Shivsena: शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरूद्ध बंड पुकारले. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे तसेच इतर खात्याचे लोक लुडबूड करतात यावरून शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, पक्षातील नेतेमंडळी, विशेषत: संजय राऊत यांच्याशी मतभेद असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. सुरतच्या हॉटेलमध्ये मिलिंद नार्वेकर शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंची समजूत काढायला गेले असता शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यावेळीही एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांविषयी नाराजीचा सूर आळवला. या मुद्द्यावर संजय राऊतांना विचारले असता, त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप केला.
संजय राऊत हे महाविकास आघाडी स्थापन करण्यात अग्रस्थानी होते. एकनाथ शिंदे यांचे मात्र भाजपासोबत शिवसेनेने सत्तास्थापना करावी असे मत होते. त्यावेळी संजय राऊत यांच्या प्रयत्नाने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचे समजले जाणारे, नगरविकास खाते देण्यात आले. पण अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांची संजय राऊत व इतरांविषयीचे खदखद बाहेर पडली. या मुद्द्यावर बोलताना संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावरच थेटआरोप केल्याचे दिसून आले.
एकनाथ शिंदेंची नाराजी अन् संजय राऊतांचा आरोप
एकनाथ शिंदे फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत असताना म्हणाले की, "संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगले बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतात. भूमिका मांडायची मग मुंबईत या असंही सांगतात. मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळं का बोलतात." त्यांना मांडलेली नाराजीबाबत जेव्हा संजय राऊतांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, "अडीच वर्ष सत्तेचा मलिदा ज्यांनी चाखला तेच लोक हे बोलतायत." संजय राऊत यांच्या या विधानाचा अर्थ नक्की काय घेतला जावा यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, पण यातून शिवसेनेत अंतर्गत धूसफुस असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.