सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमणा हे आज निवृत्त होत आहेत. आजचा दिवस सर्वोच्च न्यायालयात महत्वाचा आहे. कारण सर्व महत्वाची प्रकरणे आज सुनावणीसाठी ठेवण्यात आली आहेत. मात्र, यामध्ये अद्याप महाराष्ट्रासाठीचे महत्वाचे प्रकरण एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे वाद घेण्यात आलेला नाही. यामुळे आज घटनापीठाकडे सुनावणी होणार की नाही याबाबत कमालीची अनिश्चितता आहे.
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा दिवस असल्याने महत्वाची आणि प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात आली आहेत. यामध्ये गुजरातमधील बिलकिस बानो बलात्कार प्रकरण आणि ईडीला विशेष कायद्यानुसार दिलेले अधिकारावर फेरविचार याचिका यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे ईडीची सुनावणी ही ओपन कोर्टात होणार आहे. असे असताना महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे आणि लोकशाहीसाठी महत्वाचे प्रकरण अद्याप पटलावर न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिंदे-ठाकरे गटांच्या वादावर सोमवारी सुनावणी होणार होती. यापूर्वी देखील ती दोनवेळा पुढे ढकलण्यात आली होती. सोमवारची सुनावणी देखील पुढे ढकलण्य़ात आली. ती मंगळवारी होणार असे सांगितले जात होते. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर रात्री उशिरापर्यंत शिंदे-ठाकरे प्रकरण लिस्टच झाले नव्हते. आजही तसाच प्रकार झाला आहे. साडे दहापर्यंत याबाबत चित्र स्पष्ट होईल.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले होते. याबाबत गुरुवारी म्हणजे आज सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिका वेगळ्या केल्या जाणार आहेत. एकमेकांत गुंतागुंत वाढल्याने हे घटनापीठ महत्वाचे निर्णय घेईल व निवडणूक आयोगाची देखील जबाबदारी निश्चित करेल.