खरी शिवसेना कोणती, यावरून ते राज्यातील सत्तांतराच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरु झाला आहे. गेल्या काही तासांपासून ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडून युक्तीवाद सुरु आहे. शिवसेनेकडून युक्तीवाद करताना सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंच्या सदस्यत्वावरच प्रश्न उपस्थित केला आहे. सिब्बल यांनी शिंदे निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत, यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
उद्धव ठाकरे हे २०१८ ते २०२३ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत, असे कागदपत्र उपलब्ध आहेत. परंतू, जे एकनाथ शिंदे हे आपलीच खरी शिवसेना आहे असे सांगत आहेत, त्यांच्याकडे शिवसेनेचे साधे प्राथमिक सदस्यत्व सुद्धा नाहीय. शिंदेंनी स्वत:हून शिवसेनेचे सदस्यत्व सोडले होते. ते निवडून आलेले नाहीत तर नामनिर्देशीत सदस्य होते, असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी १९ जुलैपूर्वीच सदस्यत्व सोडले होते. निवडणूक आयोग त्यानंतर झालेल्या गोष्टींकडे पाहतोय. परंतू त्यापूर्वीच्या गोष्टी कशा दुर्लक्षित केल्या जाऊ शकतात, असेही सिब्बल यांनी पुन्हा केलेल्या युक्तीवादावर म्हणणे मांडले.
शिंदे यांनी पक्षाची फसवणूक करून विरोधी पक्षाशी युती केली. ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. यामुळे शिंदेंचे विधानसभेतील सदस्यत्व देखील अपात्र ठरते, असेही सिब्बल म्हणाले.
काय काय घडले...एखाद्या गटाला मान्यता नसेल तर त्यावर निवडणूक आयोग कसा निर्णय घेऊ शकतो असा सवाल ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात उपस्थित केला. तर, एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकाराने धनुष्यबाण हे चिन्ह मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेल्याचा सवाल खंडपीठाने विचारला.
१९ जुलैच्या स्थितीनुसार कोर्टाला निर्णय घ्यावा लागेल. विलीनकरण हा एकमेव मुद्दा आहे अशी बाजू ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. त्यात अपात्रतेचा मुद्दा विधिमंडळाचा आहे. आयोगाला राजकीय पक्षाबाबत निर्णय घ्यायचा आहे असं कोर्टाने म्हटलं.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार म्हणून की सदस्य म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले आहेत, धनुष्यबाण चिन्ह मिळण्याची मागणी करत आहेत, असा सवाल न्यायालयाने विचारला. त्यावर, ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनीही तोच प्रश्न उपस्थित केला. त्यावर, एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे सदस्य असल्यास निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात, असेही खंडपीठाने म्हटले. यावर सिब्बल यांनी शिंदे हे पक्षाचे सदस्यच नाहीत असा युक्तीवाद केला आहे.