Eknath Shinde Vs Shiv Sena: राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शिवसेना, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून घेतला आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे म्हटले. दरम्यान, यावर राज्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील सत्तापेच अजूनही कायम असून 1 ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी काही महत्वाच्या बाबींची नोंदही केली. आजचा सुनावणीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''सुप्रीम कोर्टाचा निर्णय समाधानकारक आहे. त्यांनी अफिडेव्हीट सादर करायला सांगितलेलं आहे,'' अशी माहिती शिंदे यांनी दिली.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तारशिंदे पुढे म्हणाले की, ''विरोधी पक्षाचे सरकारविरोधात जे प्रयत्न होते, त्याला कोर्टाने कुठल्याही प्रकारचे रिलीफ दिले नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यापासून, विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीपर्यंत, जे काही आम्ही केलं, ते सर्व कायदेशीररित्या केलेलं आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,'' असे ते म्हणाले. यासोबतच, राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कोर्टात काय घडलं?सरन्यायाधीश एनव्ही रमना, जस्टिस कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडली आहे. घटनात्मकरित्या हे प्रकरण अत्यंत महत्वाचे आणि गुंतागुतीचे असल्याने यापेक्षा मोठ्या खंडपीठाची गरज भासेल असे वाटतेय, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी यावेळी केली आहे. पण सध्यातरी तसे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत असेही ते पुढे म्हणाले आहेत. दुसरीकडे न्यायाधीशांनी दोन्ही पक्षकारांना 27 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता 1 ऑगस्ट रोजीच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे.