मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज दादर आणि बीकेसीत वाक् बाणांची धुमश्चक्री ऐकायला मिळणार आहे. दोन्ही गट एकमेकांना शह देण्याचा प्रय़त्न करत आहेत. अशातच उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावर एकनिष्ठांचा मेळावा असे ठळक अक्षरात लिहिलेले असताना शिंदे गटाने त्यांच्या व्यासपीठावर ही कबुतराची नाही तर गरुडाची झेप आहे, असे लिहिण्यात आले आहे. यातच हे पोस्टर व़ॉर भाजपा आणि काँग्रेसपर्यंत जाऊन पोहोचले आहे.
शिंदे गटाने व्यासपीठाच्या एका बाजुला उद्धव ठाकरे गटावर कडी करणारे बाळासाहेब ठाकरेंचे एका भाषणातील वक्तव्य छापण्यात आले आहे. यामध्ये 'मी माझ्या शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही', असे लिहिले आहे. हे दुपारपासून चर्चेचा विषय असताना तिकडे त्याला प्रत्यूत्तर म्हणून शिवसेनेने म्हणजेच ठाकरे गटाने व्यासपीठावर दुसऱ्या वक्तव्याचा बॅनर आणला आहे.
ठाकरे गटाने शिंदेंच्या काँग्रेसवरील पोस्टरला टक्कर देण्यासाठी मी माझ्या शिवसेनेला भाजपाचा गुलाम होऊ देणार नाही, असे पोस्टर आणले आहे. यामुळे आता पोस्टर वॉर रंगले असून थोड्याच वेळात दोन्ही नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढण्यास सुरुवात होणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्या शिंदेंनी अजित पवार, राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करून बंड केले ती राष्ट्रवादीच या साऱ्या पोस्टर वॉरपासून दूर राहिली आहे.
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची; बाजूला चरणसिंग थापाही उभे राहणार!
शिंदेंचा ट्विटर बॉम्ब...दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये "मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे ", या भारतीय कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांच्या दोन ओळी लिहिल्या आहेत. तसेच विचारांचे वारसदार असंही म्हटलं आहे.