मुंबईत आज शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यामुळे राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील दादर, सीएसएमटी स्टेशनवर राज्यभरातून बसेस, वाहने आणि रेल्वे येऊ लागल्या आहेत.
सीएसएमटीवर काही वेळापूर्वी २४ डब्यांच्या दोन ट्रेन दाखल झाल्या. यातून दोन्ही गटाचे सुमारे ५००० कार्यकर्ते बाहेर पडले. दोन्ही गटांचे आमदार आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यातच मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काळात होणार असल्याने त्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी शिंदे गटाने आपल्या कार्यकर्त्यांना थेट पायी बीकेसीतील मैदान गाठण्यास लावले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील पायीच दादरच्या शिवाजीपार्ककडे रवाना झाले आहेत.
शिंदे गटाच्या मेळाव्यात आज दोन खासदार आणि पाच आमदार प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गट काय भूमिका मांडतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या भाषणात काय असेल याची मिश्किल कॉपी मनसे आणि भाजपाकडून प्रसारित केली जात आहे. अशातच ठाकरेंनी आपल्या आधीच्या भाषणांद्वारे काँग्रेस, राष्ट्रवादीवर केलेल्या टीकांचे व्हिडीओ देखील व्हायरल केले जात आहेत. यामुळे आज दादर आणि बीकेसीमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय तणावाचे वातावरण असणार आहे. ठाकरे गटाने अडीज लाख तर शिंदे गटाने पाच लाख कार्यकर्त्यांची गर्दी जमा करण्याची तयारी केली आहे.