शिवसेनेच्या नावावरील कार्यालय आम्हाला मिळायला हवे. काल आम्हाला निवडणूक आयोगाने अधिकृतपणे शिवसेना दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख आहेत असे सांगतानाच ठाकरेंच्या गटातील दोन खासदार आणि दहा आमदार शिवसेनेत येतील असा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.
दोघेही शिवसेनेचेच आहेत, शिवसेनेच्याच नावावर आणि चिन्हावर ते लढले आहेत. यामुळे त्यात वेगळे असे काही नाही. दसऱ्यालाच ते सोबत येणार होते. परंतू काही कारणाने ते होऊ शकले नव्हते. मोठ्या प्रमाणावर आमदार, खासदार ज्या बाजुने जातात त्याच्या बाजुने निर्णय दिला जातो. पुढचाही न्यायालयाचा निर्णय आमच्याबाजुने लागेल असा विश्वास आहे, असे खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे.
हा पक्ष शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जाणार आहे. बाळासाहेब ठाकरेंचे आशिर्वाद आमच्या सोबत नसते तर हा विजय झालाच नसता. आम्ही हा पक्ष पुढे घेऊन जाणार आहोत, असे शिंदे म्हणाले.
निवडणूक आयोगाकडे गेलेल्या कागदपत्रांनुसार आयोगाने लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे बलाबल किती याची माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये शिंदे गटाकडे विधानसभेत ५५ पैकी ४० आमदार आहेत. तर ठाकरे गटाकडे ५५ पैकी १५ आमदार आहेत. तर विधान परिषदेचे शिंदेंकडे शून्य आणि ठाकरेंकडे १२ पैकी १२ आमदार आहेत.
Eknath Shinde Shivsena: तो १४ वा खासदार कोण? होता ठाकरे सेनेत पण शिंदेंना 'रसद' पुरवत होता
दुसरीकडे लोकसभेत १९ खासदारांपैकी शिंदे गटाकडे १३ आणि ठाकरे गटाकडे ४ खासदार आहेत. ठाकरे गटाने सहा खासदार असल्याचा दावा केला होता. परंतू आयोगाकडे ४ खासदारांचीच प्रतिज्ञापत्रे आली आहेत. यामुळे दोन खासदार तटस्थ राहिले की ते देखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे. राज्यसभेत मात्र शिंदे गटाकडे एकही खासदार नाहीय. तिकडे तीनपैकी तीन खासदार हे ठाकरे गटाकडे आहेत.