जालना मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवेंच्या दारुण पराभवानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ असला तरी अब्दुल सत्तारांचा सिल्लोड हा दानवेंच्या लोकसभा मतदारसंघात येत होता. याठिकाणी सत्तारांनी मदत केली नसल्याची टीका होत आहे. यातच काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांनी सत्तारांची गळाभेट घेतली. यावरून आता सत्तारांनीच एकनाथ शिंदेंपासून वेगळे होण्याचे संकेत दिले आहेत.
माझा शिवसेनेसोबत प्रासंगिक करार आहे. ज्यादिवशी शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्या दिवशी मी योग्य निर्णय घेईन असे स्पष्ट संकेत सत्तार यांनी दिले आहेत. तसेच आमचे संबंध चांगले आहेत. 2019 मध्ये जे घडलं होतं त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे होते. तेव्हा ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते, असे वक्तव्य करून सत्तारांनी राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
दानवे यांच्या पराभवावर बोलताना सत्तारांनी महायुतीचे काम केले परंतु मनात कल्याण काळे होते, असा खुलासाही केला आहे. सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातून दानवेंना मताधिक्य मिळाले नाही यावरून सत्तारांवर टीका होत होती. यावर सत्तारांनी दानवेंना त्यांच्या भोकरदनमधूनही मते मिळाली नसल्याचे सांगितले. जालन्यात जरांगेंचा परिणाम जाणवत होता. मी दानवेंसाठी सिल्लोडमध्ये १७ सभा घेतल्या. आमचे कार्यकर्ते यावेळी नाराज होते हे मी दानवेंना सांगितलेले. आम्हाला शत्रू म्हणणाऱ्या लोकांनी पैठणमधून किती मतदान आहे हे पाहावे, असा सल्लाही सत्तार यांनी विरोधकांना दिला.
तसेच माझ्या काही कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांना मदत केली, हे मला मान्य आहे. मला विधानसभेला त्यांनी मदत न केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. याची कल्पना मी शिंदे, फडणवीसांनाही दिली होती. रावसाहेब दानवे माझे जवळचे मित्र आहेत, पण हृदयातील मित्र काळे आहेत, असेही सत्तार म्हणाले.
2019 मध्ये काय घडलेले...२०१९ चा संदर्भ सत्तार यांनी दिला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तारांना काँग्रेसमधून भाजपात जायचे होते. परंतु देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शिंदेंशी चर्चा करून शिवसेनेत जाण्यास सांगितले होते. यानुसार सत्तार शिवसेनेते गेले होते. आता कल्याण काळे यांच्या निमित्ताने सत्तार पुन्हा काँग्रेसवासी होण्याची चर्चा रंगली आहे.