मुंबई : महिनाभरापूर्वीपासूनच कुरबूर सुरू होती. तेव्हा २० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वर्षावर बोलावून घेत तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा थेट प्रश्न केला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी इतर मुद्दे मांडत मूळ प्रश्नाला बगल दिली, असा आरोप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेतृत्वाकडून सध्या मुंबईत विविध मेळावे घेतले जात आहेत. कलिना येथे शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा थेट प्रश्न विचारल्यावर प्रश्न टाळत निधी मिळत नाही, आमदारांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा आहे, ही फाईल उघडली आहे-ती फाईल उघडली आहे, अशी भाषा त्यांनी केली. नाटक केले, रडगाणे झाले. पण या २० जूनला व्हायचे होते ते झालेच. तरीही तिथले १५ ते २० लोक आपल्या संपर्कात आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
विजय हा शिवसेनेचाच -- आमचाच गट अधिकृत, आम्ही बाळासाहेब ठाकरे शिवसेना, ही नावे लावण्याची तुमची लायकी असती तर तुम्ही बंड करायला सुरतला पळाला नसता. - बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे भक्त असते तर त्यांनी समोर येऊन सांगितले असते की मला मुख्यमंत्री बनवा. महाराष्ट्रात लपून बसायची हिंमत नाही, म्हणून गुवाहाटीला पळाले, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला. - विरोधी पक्षात बसण्यासाठी केलेले हे देशातील पहिलेच बंड असेल. पण ते विधानसभेत येणार नाहीत, याची पुरेपूर काळजी आम्ही घेत आहोत. आकड्यांचा खेळ आता कसाही दिसत असला तरी सभागृहात विजय हा शिवसेनेचाच होईल, असेही ते म्हणाले.