मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडाला शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाने पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज विधानसभेत विश्वासमत जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गेल्या पंधरवड्यामध्ये झालेल्या सर्व आरोपांना आणि टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच अभिनंदन प्रस्तावानंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यानचा घटनाक्रम आणि बंडाला मिळालेल्या समर्थनाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झालं आहे. गेले १५-२० दिवस शिवसेना आणि सहयोगी पक्षांचे आमदार माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं, त्यांचं अभिनंदन करतो. आभार मानतो. कारण आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील अनेक घटना पाहिल्या. तर लोकप्रतिनिधीन असलील, आमदार खासदार असतील तर ते विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांकडे वाटचाल करतात. मात्र माझ्यासोबत आलेल्या मंत्र्यांनी स्वत:चं मंत्रिपद पणाला लावून आमदारकी पणाला लावून, बलाढ्य सरकार मोठमोठी माणसं, मोठमोठे मंत्री यांचा दबाव झुगारून एका सामान्य शिवसैनिकावर विश्वास ठेवून मोठा निर्णय घेतलाय, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीदरम्यान, सुरू झालेल्या बंडाबाबतही मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले. ज्या दिवशी विधानभवनातून आम्ही निघालो. त्याच्या आदल्या दिवशी मी अस्वस्थ होतो. दुसऱ्या दिवशी मतदान होतं. त्या दिवशी मला जी वागणून मिळाली. माझ्याशी ज्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न झाला त्याचे साक्षीदार इकडचे आणि तिकडचे आमदार आहेत, असे ते एकनाथ शिंदे म्हणाले.
मी नम्रपणे सांगू इच्छतो की, त्यावेळी मला तेव्हा काय झालं माहिती नाही. बाळासाहेब नेमही सांगायचे की अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी बंड असेल उठाव असेल काही असेल केला पाहिले. माझा फोन फिरू लागला आणि धडाधड लोक जमू लागलो. कुठे जातोय काय करतोय, कशासाठी जातोय कुणी काही विचारलं नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही निघाल्यानंतर जयंत पाटील, अजित पवार, मुख्यमंत्री महोदयांचाही फोन आला. इतरांचेही फोन आले. काही लपवू इच्छित नाही. मला विचारलं, कुठे चाललात? मी म्हणालो मला माहिती नाही. कधी येणार? मी म्हटलं मला माहिती नाही. आमच्या आमदारांनाही फोन आले, पण एकाही आमदारानं असं म्हटलं नाही की, आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊया. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, हा त्यांचा विश्वास आहे. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे. माझं खच्चिकरण कसं होत होतं, हे सुनील प्रभू यांनाही माहिती आहे. त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे. मी ठरवलं लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माधार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल. एकटा शहीद होईन. एकटा शहीद होईन बाकीचे वाचतील. मी सांगितलं होतं की चिंता करू नका. ज्या दिवशी मला वाटेल तुमचं नुकसान होतंय, त्यादिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा निरोप घेऊन निघून जाईन, असं मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.