लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील; कारण त्यांना आम्ही विधान परिषदेवर घेऊ. मग त्यांच्यासोबत आलेल्या ३९ आमदारांचे पुनर्वसन कसे करणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
आव्हाड म्हणाले, मुळात शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्याने किंवा त्यांना विधान परिषदेवर घेतल्याने प्रश्न तिथेच संपतो का? त्यांच्यासोबत आलेल्या ४० जणांपैकी तुम्ही एकाचे पुनर्वसन करणार आहात. मग उर्वरित आमदारांचे काय होणार? ते तर गेले ना जिवानिशी, त्यांचे राजकारणच संपले, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सनातन धर्म कसा जन्मला हे आधी बावनकुळे यांनी सांगावे. बुद्धांनी समतेची ज्योत का पेटवली, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी रोखला, असे अनेक सवालही आव्हाड यांनी उपस्थित केले.