मुंबई : जवळपास गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार का? याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेबाबत मोठे विधान केले आहे. एकनाथ शिंदे अपात्र होतच नाहीत. ते झाले तरी देखील विधानपरिषदेवर येऊ शकतात. पण, आम्ही कायद्याने सर्वकाही केले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
"ज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाची केस वाचली आहे. ते शंभर टक्के सांगतील की, एकनाथ शिंदे अपात्र होणार नाही. अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. एकनाथ शिंदे डिस्कॉलीफाय होतच नाहीत. ते झाले तरी देखील विधानपरिषदेवर येऊ शकतात. पण आम्ही कायद्याने सर्वकाही केले आहे. आम्हाला कोणतीही भीती नाही. उद्धव ठाकरे हे उर्वरित पक्ष वाचवण्यासाठी ते लोकांना आशा दाखवत आहेत. हे सरकार पूर्णवेळ चालणार आहे. बी प्लानची गरज नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील", असे देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
याचबरोबर, अजित पवार आमच्यासोबत शंभर टक्के कन्फर्टेबल आहेत. सरकार स्थिर होते. राजकारणात शक्ती वाढवावी लागते. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत २०१९ ला ही येणार होती. त्यांना आमच्यासोबत यायचे होते. तसेच, अजित पवार सत्तेत सामील झाले तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगितले होते की, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील आणि त्यांनी ते मान्य केले आहे. अजित दादा हे मॅच्युअर राजकारणी आहेत. अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा शब्द दिला होता. तो आम्ही पूर्ण केला आहे. अजित पवार एक अनुभवी नेते आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, काल भाजपच्या ट्विटर हँडलवरील मी पुन्हा येईनच्या व्हिडिओवरुन राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री परिपक्व आहेत. त्यांना राजकीय परिस्थिती माहिती आहे. आमचा संवाद ही इतका चांगला आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक काही लोकांनी याचा खेळ करण्याचा प्रयत्न केला. इशारा हा व्हिडिओच्या माध्यमातून दिला जात नाही. सरकार व्यवस्थित चालले आहे. अनेक आव्हाने आहेत. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे इशारा देण्याचा प्रश्नच येत नाही. सरकारमध्ये सर्वकाही अलबेल आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.